जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर माणूस काहीही साध्य करु शकतो, याचंच एक उदाहरण म्हणजे रवी पिल्लई. ज्यांनी एका गरीब शेतकऱ्याच्या घरात जन्म घेतला होता. पण, त्यांनी त्यांच्या परिस्थितीवर मात करुन आयुष्यात काहीतरी मोठं करण्याचा निर्णय घेतला. आज ते जगातील सर्वात श्रीमंत १००० लोकांपैकी एक आहेत
आरपी ग्रुप ऑफ कंपनीजचे अध्यक्ष बी. रवी पिल्लई यांनी जून २०२२ मध्ये १०० कोटी रुपयांना एअरबस H145 हेलिकॉप्टर खरेदी केले. हे हेलिकॉप्टर खरेदी करणारे ते पहिले भारतीय होते. रवी पिल्लई यांचा जन्म केरळमधील एका सामान्य शेतकरी कुटुंबात झाला होता. परंतु, त्यांच्या मेहनतीमुळे त्यांनी यशाचं सर्वोत्तम शिखर गाठलं. शिकत असतानाच त्यांनी सावकाराकडून एक लाख रुपयांचं कर्ज घेऊन चिटफंड कंपनी सुरू केली आणि आज त्यांच्या कंपन्यांमध्ये ७० हजाराहून अधिक लोक काम करतात. फोर्ब्सच्या मते, त्यांची एकूण संपत्ती ३.२ अब्ज डॉलर्स इतकी आहे.
रवी पिल्लई यांचा जन्म २ सप्टेंबर १९५३ ला केरळमधील कोल्लम जिल्ह्यातील चावरा गावात झाला. त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह शेतीतून होत होता. कुटुंबाकडे उत्पन्नाचे दुसरे साधन नव्हते. अनेकदा त्यांना खायलाही काही नसायचं. पण, हीच परिस्थिती त्यांच्यासाठी प्रेरणादायी ठरली. त्यांनी स्थानिक महाविद्यालयातून पदवी घेतल्यानंतर कोची विद्यापीठातून बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशनमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले. शिकत असतानाच त्यांनी ठरवलं होते की ते नोकरी नाही तर व्यवसाय करतील.
शिक्षण घेत असतानाच पिल्लई यांनी कोची येथे एका स्थानिक सावकाराकडून एक लाख रुपये कर्ज घेऊन स्वतःची चिट-फंड कंपनी सुरू केली. या व्यवसायातून पैसे कमवून त्यांनी कर्जाची परतफेड केली आणि नफ्याच्या पैशांची बचत केली. त्यानंतर त्यांनी स्वतःची बांधकाम कंपनी सुरू केली. त्यांना वेल्लोर हिंदुस्थान न्यूजप्रिंट फॅक्टरीचे कंत्राट मिळाले. परंतु, कामगारांच्या समस्येमुळे त्यांना कंपनी बंद करावी लागली. पण, पिल्लई यांनी हार मानली नाही. १९७८ मध्ये ते भारत सोडून सौदी अरेबियाला गेले. या देशात त्यांनी बांधकाम आणि व्यापाराचा व्यवसाय सुरू केला. लवकरच त्यांनी सौदी अरेबियामध्ये नसीर एस अल हाजरी नावाची स्वतःची बांधकाम कंपनी सुरू केली. १५० लोकांसह त्यांनी ही कंपनी सुरु केली होती.
रवी पिल्लई यांचा बांधकाम व्यवसाय दिवसेंदिवस वाढतच गेला. जगातील मोठमोठ्या कंपन्यांकडून त्यांना कंत्राटे मिळाली. त्यांचा व्यवसाय आलिशान हॉटेल्स, स्टील, गॅस, सिमेंट आणि शॉपिंग मॉल्सपर्यंत पसरलेला आहे. त्यांना २०१० मध्ये पद्मश्री आणि २००८ मध्ये प्रवासी भारतीय सन्मानाने सन्मानित करण्यात आले होते. The Raviz Ashtamudi, The Raviz Kovalam आणि The Raviz Kadavu सारखी अनेक पंचतारांकित हॉटेल्स देखील त्यांच्या मालकीची आहेत. जगभरातील अनेक शहरांमध्ये त्यांची मालमत्ता आहे. अनेक बँका आणि रिअल इस्टेटमध्येही त्यांची भागीदारी आहे. त्यांचं केरळमधील कोल्लम येथे ३०० खाटांचे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल देखील आहे.
त्यांचा आरपी ग्रुप हा मध्य पूर्वेतील भारतीय कामगारांना रोजगार देणारा सर्वात मोठा ग्रुप आहे. नोव्हेंबर २०१५ मध्ये त्यांच्या मुलीच्या लग्न समारंभात ४२ देशांतून सुमारे ३० हजार पाहुणे आले होते, यावरुनच त्यांच्या श्रीमंतीचा अंदाज लावता येतो. हा विवाहसोहळा केरळमधील सर्वात महागडा विवाहसोहळा होता. बाहुबली या सुपरहिट चित्रपटाच्या प्रोडक्शन डिझायनरने याचे आयोजन केले होते. त्यांच्याकडे कोट्यवधी रुपयांच्या महागड्या कार आणि १०० कोटी रुपयांचे एअरबस हेलिकॉप्टर आहे. फोर्ब्सच्या मते, त्यांची एकूण संपत्ती ३.२ अब्ज डॉलर्स आहे आणि ते जगातील सर्वात श्रीमंत १००० लोकांपैकी एक आहेत.
रवी पिल्लई हे जून २०२२ मध्ये तेव्हा चर्चेत आले जेव्हा त्यांनी १०० कोटी रुपयांचे हेलिकॉप्टर खरेदी केले. Airbus H145 खरेदी करणारे ते पहिले भारतीय होते. पिल्लई यांच्याशिवाय लुलू ग्रुपचे युसूफ अली यांच्याकडेही हे हेलिकॉप्टर आहे. या हेलिकॉप्टरमध्ये दोन पायलट आणि सात जण बसू शकतात. त्याचा वेग ताशी २४६ किमी आहे. १७९२ किलो वजनाचे हे हेलिकॉप्टर ६८० किमीपर्यंत उड्डाण करण्यास सक्षम आहे. रवी पिल्लई आणि युसूफ अली हे दोघेही केरळचे असून दोघांनीही मध्यपूर्वेतील देशांमध्ये मोठे यश संपादन केले.