सोलापूर – केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या Support for Marginalized Individuals for Livelihood and Enterprise (SMILE) योजनेअंतर्गत तृतीयपंथी विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत इयत्ता 9 वीपासून पदव्युत्तर शिक्षणापर्यंत शिक्षण घेणाऱ्या तृतीयपंथी विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य देण्यात येणार आहे.
पात्रता : शासनमान्य शाळा, महाविद्यालये, विद्यापीठे तसेच UGC/AICTE मान्यताप्राप्त अभ्यासक्रमांमध्ये शिक्षण घेणारे विद्यार्थी यासाठी पात्र राहतील.
निकष:- Transgender Certificate असणे आवश्यक आहे.
लाभाचे स्वरूपः- पूर्व-माध्यमिक (Pre-Matric) व उत्तर-माध्यमिक (Post-Matric) स्तरासाठी वार्षिक रु. 13 हजार 500 इतकी शिष्यवृत्ती तसेच अर्जदार भारतीय नागरिक असावा व इतर कोणत्याही केंद्र अथवा राज्य शासनाच्या शिष्यवृत्तीचा लाभ घेत नसावा व विद्यार्थ्यांचे बँक खाते आधार संलग्न असणे आवश्यक आहे.
जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालये, स्वयंसेवी संस्था व संबंधित यंत्रणांनी या योजनेची व्यापक प्रसिद्धी करून पात्र तृतीयपंथी विद्यार्थ्यांना अर्ज प्रक्रियेसाठी मार्गदर्शन करावे, असे निर्देश समाज कल्याण आयुक्तालयाने दिले आहेत. अधिक माहितीसाठी तृतीयपंथी व्यक्तींनी केंद्र शासनाच्या https://transgender.dosje.gov.in या राष्ट्रीय पोर्टलवर अर्ज करावा असे आवाहन सहायक आयुक्त समाज कल्याण सुलोचना सोनवणे यांनी केले आहे.






















