टेंभुर्णी – भीमा नदीच्या कृष्णा खोऱ्यात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे पुणे जिल्ह्यातून उजनी धरणाकडे येणाऱ्या पाण्याचा ओघ आणखी वाढला असून, शनिवारी (दि. २५ जुलै) सायंकाळी ६ वाजेच्या अहवालानुसार धरणात तब्बल ७४,०३० क्युसेक्स वेगाने पाणी दाखल होत आहे. या वाढत्या आवकेमुळे उजनी धरणातील पाणीसाठ्यात सातत्याने वाढ होत असून, धरणाचा उपयुक्त पाणीसाठा ७४.२८ टक्क्यांवर पोहोचला आहे.
सध्या उजनी धरणाची पाणीपातळी ४९५.६०५ मीटर इतकी असून, धरणातील एकूण पाणीसाठा २९२९.७१ दशलक्ष घनमीटर (१०३.४५ टीएमसी) इतका झाला आहे. तर उपयुक्त पाणीसाठा ११२६.९० दशलक्ष घनमीटर (३९.७९ टीएमसी) इतका नोंदविण्यात आला आहे. धरणाच्या जलसाठा क्षेत्राचा विस्तारही वाढून ३०१.९२ चौ. कि.मी. इतका झाला आहे.
दौंड नदी मापन केंद्रावर नदीची पाणीपातळी ५०१.७५० मीटर नोंदली गेली असून, तेथून मोठ्या प्रमाणात पाणी उजनी धरणाकडे येत आहे. त्यामुळे पुढील काही दिवसही धरणातील पाणीसाठा झपाट्याने वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
विशेष म्हणजे, एवढी मोठी आवक सुरू असतानाही धरणाच्या सांडव्यावरून किंवा वीजगृहातून नदीपात्रात कोणताही विसर्ग करण्यात आलेला नाही. मात्र सिंचनासाठी मुख्य कालव्यातून २,००० क्युसेक्स, बोगद्यातून ९०० क्युसेक्स, सिना-माढा उपसा सिंचन योजनेसाठी २८० क्युसेक्स आणि दहीगाव उपसा सिंचन योजनेसाठी ९० क्युसेक्स पाणी सोडण्यात येत आहे.
भीमा खोऱ्यात पावसाचा जोर कायम राहिल्यास आणि वरच्या धरणांतून येणारी आवक अशीच सुरू राहिल्यास, उजनी धरणातील पाणीसाठ्यात आणखी वेगाने वाढ होण्याची शक्यता असून, प्रशासन परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. सध्या धरणातील वाढता जलसाठा शेतकरी, पाणीपुरवठा आणि सिंचनाच्या दृष्टीने दिलासादायक मानला जात आहे.





















