सोलापूर : महापालिकेतील दोन सहाय्यक आयुक्तांकडे नियंत्रण अधिकारी म्हणून जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यानुसार कामगार व जन संपर्क कार्यालय (दिव्यांग विभागासह) सहायक आयुक्त विनोद कुलकर्णी यांच्याकडे तर महिला व बालकल्याण विभाग हा सहायक आयुक्त मनीषा मगर यांच्या नियंत्रणाखाली राहणार आहे. महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी तसे आदेश काढले आहेत.
सोलापूर महानगरपालिकेच्या विविध विभागांच्या कामकाजात अधिक सुसूत्रता आणण्यासाठी महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी सुधारित विभाग वाटप आदेश जारी केला आहे. कामगार व जन संपर्क कार्यालय (दिव्यांग विभागासह) तसेच महिला व बालकल्याण विभाग नियंत्रण अधिकारी म्हणून जबाबदारी आता संबंधित सहायक आयुक्तांकडे सोपविण्यात आली आहे.
महापालिका अधिनियमातील तरतुदीनुसार आयुक्तांच्या नियंत्रण व पुनर्विलोकनाच्या अधीन राहून विभागांचे कामकाज अधिकाऱ्यांकडे सोपविण्यात येते. यापूर्वीच्या विभाग वाटप आदेशातील कामकाजाचा पुनर्विलोकन करून आवश्यक ते बदल करण्यात आल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.
कामगार व जनता संपर्क कार्यालय (दिव्यांग विभागासह) या विभाग नियंत्रण जबाबदारी यापूर्वी उपायुक्त सोनाली यादव यांच्याकडे होती. आता हा विभाग सहायक आयुक्त विनोद कुलकर्णी यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. त्याचप्रमाणे महिला व बालकल्याण विभागाची जबाबदारीही यापूर्वी उपायुक्त सोनाली यादव यांच्याकडे होती. आता या विभागासाठी सहायक आयुक्त मनीषा मगर यांची नियंत्रण अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.उर्वरित विभागांबाबत पूर्वीच्या विभाग वाटपानुसार देण्यात आलेले आदेश कायम ठेवण्यात आले आहेत.
—
Post Views: 81