
सोलापूर – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाशी संलग्न विविध संस्था व महाविद्यालयांची बैठक सोलापूर येथील छत्रपती शिवाजी नाईट कॉलेज येथे संपन्न झाली. या बैठकीत संस्थाचालक, प्राचार्य, प्राध्यापक व कर्मचारी यांचे शासन पातळीवरील व विद्यापीठस्तरीय प्रश्न सोडवण्यासाठी ‘विद्यापीठ विकास कृती समिती, सोलापूर’ची स्थापना करण्यात आली आहे.
या बैठकीच्या अध्यक्षस्थानी संस्था चालक संघटनेच्या अध्यक्षा पद्मजादेवी मोहिते पाटील या होत्या. शासन, विद्यापीठ आणि विद्यापीठाशी संलग्नित सर्व संस्था व महाविद्यालये यांच्यातील संवाददरी विकसित व्हावी, या हेतूने ही कृती समिती स्थापन करण्यात आली आहे.
बैठकीत शासन, विद्यापीठ, संस्था, प्राचार्य, प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थी यांच्या विविध शैक्षणिक समस्या व अडचणींवर सविस्तर चर्चा झाली. या समस्या सोडवण्यासाठी सर्व संघटनांनी एकत्र राहून विद्यापीठाच्या आणि महाविद्यालयांच्या विकासासाठी प्रयत्न करण्याच्या हेतूने सर्वांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे.
या बैठकीस संस्थाचालक संघटना, प्राचार्य संघटना, सुटा संघटना, प्रशासकीय कर्मचारी संघटना तसेच अन्य संघटनेचे पदाधिकारी व सदस्य बहुसंख्येने उपस्थित होते.






















