सोलापूर – जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्था (क्र. २) मर्यादित, सोलापूरची ६२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवार, दि. १३ जून २०२६ रोजी समाजकल्याण केंद्र, सोलापूर येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. संस्थेचे चेअरमन रणजित शिवाजी घोडके यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेला सभासदांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली.
सभेची सुरुवात प्रमुख मान्यवर सेवानिवृत्त सभासद क्षीरसागर, वासुदेव घाडगे, पांडुरंग शिंदे यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आली. पतसंस्थेचे चेअरमन रणजित घोडके यांनी संस्थेच्या प्रगतीचा आढावा घेत सभासदांच्या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. संस्थेचे सचिव बापूराव जगताप यांनी विषयपत्रिकेचे वाचन केले. सभेतील सर्व विषयांना उपस्थित सभासदांनी सर्वानुमते मंजुरी दिली.
यावेळी संस्थेच्या सभासदांच्या गुणवंत पाल्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. तसेच संस्थेच्या विकासात योगदान देणाऱ्या सेवानिवृत्त सभासदांचा शाल, श्रीफळ आणि मानाचा फेटा देऊन गौरव करण्यात आला. या उपक्रमामुळे सभागृहात भावनिक आणि आनंददायी वातावरण निर्माण झाले.
सभेचे प्रास्ताविक संचालक गिरीष यल्लप्पा जाधव यांनी केले, तर आभार प्रदर्शन व्हाईस चेअरमन शशिकांत दत्तात्रय साळुंखे यांनी केले. याप्रसंगी मानद सचिव श्रीकृष्ण शंकर घंटे, खजिनदार प्रदीप विश्वनाथ सगट, संचालक सुधाकर माने-देशमुख, श्रीकांत धोत्रे, शिवाजी कांबळे, अंकुश कोळेकर, मोहन यादव, दिनेश बनसोडे, समीर शेख, भीमाशंकर वाले, महेश जाधव तसेच संचालिका संगीता हांडे आणि राणी सुतार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
सभेच्या यशस्वी आयोजनासाठी सचिव बापूराव जगताप, संतोष जाधव, शामराव बोरगे आणि उमाकांत शहापूरकर यांनी विशेष परिश्रम घेतले. खेळीमेळीच्या वातावरणात पार पडलेल्या या सभेने संस्थेच्या एकोप्याची आणि प्रगतीशील वाटचालीची साक्ष दिली.





















