सोलापूर : शहरात पाणीटंचाईचे संकट गडद होण्याची शक्यता असताना दुसरीकडे महापालिकेच्या जलवाहिनीला गळती लागून हजारो लिटर पाणी वाया जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. यामुळे परिसरात पाणी साचले असून, पाण्याची नासाडी थांबविण्यासाठी महापालिका प्रशासनाने तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी नगरसेवक राजकुमार पाटील यांनी केली आहे.
तुळजापूर नाक्यावरून मार्केट यार्डकडे जाणाऱ्या रस्त्यावर दयानंद कॉलेजलगत असलेल्या शेतातील जलवाहिनीच्या व्हॉल्व्हमधून मोठ्या प्रमाणात पाणी गळती होत आहे. यंदा शहरात पावसाचे प्रमाण अत्यल्प असल्याने पाणीपुरवठ्याचे नियोजन महत्त्वाचे ठरणार आहे. अशा परिस्थितीत जलवाहिनीला गळती लागून पिण्याचे पाणी वाया जाणे ही गंभीर बाब आहे. एकीकडे नागरिकांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन केले जाते, तर दुसरीकडे महापालिकेच्या जलवाहिनीतून मोठ्या प्रमाणात पाणी वाहून जात होते. दयानंद कॉलेजलगतच्या शेतातील जलवाहिनीच्या व्हॉल्व्हमधून पाणी बाहेर पडत असल्याने मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. ही गळती वेळीच रोखली नाही, तर पाण्याची आणखी नासाडी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे संबंधित विभागाने तातडीने घटनास्थळी पाहणी करून गळती दुरुस्त करावी, अशी मागणी पाटील यांनी केली आहे. गळती थांबविण्याबरोबरच या प्रकाराला जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणीही नगरसेवक राजकुमार पाटील यांनी केली आहे.
Post Views: 7