सोलापूर : महापालिका जागेवर अनधिकृतपणे ताबा घेऊन नवीन सायकल बनविण्यासह मावा तयार करण्याचे काम सुरू असल्याचे आयुक्तांच्या पाहणीत निदर्शनास आल्यानंतर साखरपेठ येथील महापालिकेच्या कै. यशोदाबाई सिद्रामप्पा दिड्डी आरोग्य केंद्राच्या मागील बाजूस असलेले समाजमंदिर आणि खुली जागा सील करण्याची कारवाई महापालिका पथकाने पूर्ण केली. भूमी – मालमत्ता विभाग आणि अतिक्रमण प्रतिबंधक विभागाने ही संयुक्त कारवाई केली.
महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी १३ ऑक्टोबर रोजी सायंकाळी आरोग्य केंद्राच्या दुरुस्ती कामाची पाहणी केली. यावेळी आरोग्य केंद्राच्या मागील बाजूस असलेल्या खुल्या जागेत आणि समाजमंदिराच्या इमारतीत अनधिकृतपणे ताबा घेऊन काम सुरू असल्याचे आढळले होते. मनपा आयुक्तांनी तत्काळ अतिक्रमण विभागाला संबंधित साहित्य जप्त करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार साहित्य जप्त करण्यात आले.
महापालिकेच्या मालकीच्या जागेवरील अतिक्रमण दूर करून भविष्यात पुन्हा अनधिकृत ताबा होऊ नये, यासाठी समाजमंदिर आणि खुली जागा सील करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी दिले होते.
त्यानंतर अतिरिक्त आयुक्त वीणा पवार यांनी संबंधित जागा सील करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार भूमी व मालमत्ता विभाग आणि अतिक्रमण प्रतिबंधक विभागाचे पाच कर्मचाऱ्यांचे संयुक्त पथक नियुक्त करण्यात आले होते. या पथकाने आज ही समाज मंदिर आणि खुली जागा सिलिंगची कारवाई पूर्ण केली. कारवाईदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस बंदोबस्त तैनात होता. छायाचित्रण आणि व्हिडिओ चित्रीकरण करत ही कारवाई करण्यात आली.
या पथकाने केली कारवाई
महापालिका अतिरिक्त आयुक्त वीणा पवार यांच्या आदेशानुसार महापालिका भूमी व मालमत्ता विभागाचे कार्यालय अधीक्षक प्रशांत जाधव, अतिक्रमण प्रतिबंधक विभागाचे कनिष्ठ अभियंता गणेश काकडे, कनिष्ठ अभियंता स्वप्निल पवार, भूमी व मालमत्ता विभागातील कर्मचारी रघुनाथ सुरवसे आणि रखवालदार अर्जुन चव्हाण यांच्या पथकाने ही कारवाई केली. महापालिकेच्या सार्वजनिक मालमत्तेचा अनधिकृत वापर रोखण्यासाठी प्रशासनाने हे पाऊल उचलले आहे.
Post Views: 8