सोलापूर – शहर गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाने सोलापुरातील गड्डा यात्रा, लग्नकार्य तसेच घरातून दागिन्यांची चोरी करणाऱ्या दोन सराईत महिला चोरांना अटक करून चोरीचे 3 लाख 8 हजार रुपय किमतीचे सोने – चांदीचे दागिने जप्त केले आहे.
निता किरण काळे (वय 45, रा. मु.पो. शिरापूर, लोकमंगल साखर कारखाना जवळ, ता. मोहोळ) आणि मोनिका प्रशांत रोहिटे (वय 32, रा. थोबडे वस्ती, जुनी लक्ष्मी मिल चाळ, डोणगांव रोड, सोलापूर) अशी अटक करण्यात आलेल्या त्या चोर महिलांची नावे आहेत.
शहर गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अरविंद माने यांनी शहरातील वाढत्या चोरीच्या घटनांचा शोध घेण्याबाबत गुन्हे शाखेच्या पथकास सूचना केल्या होत्या. त्या अनुषंगाने तपास करताना फौजदार मुकेश गायकवाड व त्यांच्या पथकाने शहरात चोरी करणाऱ्या वरील दोन्ही महिलां अरविंद ताब्यात घेतले. त्यातील निता काळे हिने सिध्देश्वर यात्रेत चोरी केल्याची कबुली दिली. तिच्याकडून एक तोळ्याचे चांदीचे ब्रासलेट, रोख सहा हजार रुपये पोलिसांनी जप्त केले.
तर दुसरी आरोपी महिला मोनिका रोहिटे हिने हिप्परगा येथे लग्नकार्यात चोरी केल्याची कबुली दिली. तिच्याकडून तीन लाख रुपये किमतीचे पावणेतीन तोळ्याचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.
सदरची कामगिरी शहर गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अरविंद माने यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार मुकेश गायकवाड ,पोलीस अमलदार – नंदराम गायकवाड, वाजीद पटेल, योगेश बर्डे, संजय साळुंखे, अजिंक्य माने, सुमित्रा बारबोले, निलोफर तांबोळी, बाळु काळे, सतिश काटे यांनी पार पाडली आहे.

























