सांगोला – महाराष्ट्र शासनाच्या कामगार विभाग व कामगार कल्याण सोलापूर विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या सोलापूर जिल्हास्तरीय खुल्या भजन स्पर्धेत सांगोला शहरातील यमाई महिला भजनी मंडळाने प्रथम क्रमांक पटकावला. यामुळे त्यांची येत्या दि.३० जानेवारी २०२७ रोजी संतश्रेष्ठ गजानन महाराज नगरी, शेगाव येथे होणाऱ्या राज्यस्तरीय भजन स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या स्पर्धेत मंडळाच्या सदस्यांनी आपल्या सुमधुर गायनाने आणि शिस्तबद्ध वादनाने परीक्षकांची व रसिकांची मने जिंकली. केवळ सांघिक प्रथम क्रमांकावरच न थांबता, या मंडळाने जिल्हा सर्वोत्कृष्ट तालसंच म्हणूनही प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकावून दुहेरी यश मिळवले आहे. यासाठी भजन संगीत मार्गदर्शन साधना कुलकर्णी यांनी तर संगीत साथ शशिकांत लाटणे, तबलावादन अभय मिले यांनी दिली. या दैदिप्यमान यशाबद्दल सर्वत्र मंडळाचे कौतुक होत आहे.
Views: 27