सोलापूर – सामाजिक बांधिलकी जपत धार्मिक, सांस्कृतिक, कला, क्रीडा आणि कीर्तन क्षेत्रात मोलाचे योगदान देणारे शहर काँग्रेसचे माजी अध्यक्ष स्व. धर्मा भोसले यांच्या कार्याचा वारसा नगरसेवक विनोद भोसले समर्थपणे पुढे नेत आहेत, असे गौरवोद्गार आमदार देवेंद्र कोठे यांनी काढले.
स्व. धर्मा भोसले यांच्या सातव्या पुण्यस्मरणानिमित्त नगरसेवक विनोद भोसले मित्र परिवाराच्या वतीने नरसिंग गिरणी चाळ पेठ येथील बाल हनुमान मंदिरात अभिवादन व गुलाल कीर्तन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी स्व. धर्मा भोसले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून उपस्थित मान्यवरांनी अभिवादन केले.
सुभाष महाराज शिंदे यांनी गुलाल कीर्तनातून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. कीर्तनाच्या माध्यमातून त्यांनी स्व. धर्मा भोसले यांच्या सामाजिक कार्याचा आणि विविध क्षेत्रांतील योगदानाचा गौरव केला. समाजातील विविध घटकांशी जिव्हाळ्याचे संबंध जपत त्यांनी केलेले कार्य प्रेरणादायी असल्याचे सांगत, त्यांच्या विचारांचा आणि समाजसेवेचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याचे महत्त्व अधोरेखित केले.
आमदार देवेंद्र कोठे म्हणाले, “माझे आजोबा विष्णुपंत कोठे आणि धर्माजी भोसले यांच्यात जिव्हाळ्याचे ऋणानुबंध होते. हे संबंध आजही मी आणि विनोद भोसले जपत आहोत. धर्माजींनी समाजासाठी केलेले कार्य त्यांचे पुत्र नगरसेवक विनोद भोसले समर्थपणे पुढे नेत आहेत.”
या कार्यक्रमास भाजप नेते तथा माजी उपमहापौर दिलीप कोल्हे, नगरसेविका विजयाताई खरात, नगरसेवक अक्षय अंजीखाने, प्रशांत पल्ली, भाजप मंडल अध्यक्ष नागेश खरात, माजी नगरसेवक विवेक खरटमल, ज्येष्ठ पत्रकार अरुण खोरे, काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष सुनील रसाळे, उत्तर सोलापूर तालुका काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष प्रा. सिद्राम सलवदे, उद्योगपती रमेश भोसले, किरण मोरे, सरकोलीचे सरपंच पांडुरंग भोसले, तिरुपती परकीपडला, राजन कामत, केशव इंगळे, यशवंत पाथरूड, बाळासाहेब मोरे, लहू गायकवाड, शहराध्यक्ष शरद गुमटे, संजय गायकवाड, सुभाष वाघमारे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी ज्ञानेश्वर महाराज चव्हाण, तुकाराम महाराज देवकते, चंद्रकांत शिरसागर, महादेव बुवा शिंदे चॅरिटेबल ट्रस्ट, बाल हनुमान भजनी मंडळ, गणराज तरुण मंडळ, एनजी मिल चाळ, स्व. धर्मा भोसले सोशल फाउंडेशन आणि नगरसेवक विनोद भोसले मित्र परिवाराने परिश्रम घेतले.