सोलापूर : पंडित दीनदयाळ उपाध्याय दंत महाविद्यालयातील नॉन-टीचिंग कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीचा प्रश्न अखेर मार्गी लागला असून कर्मचाऱ्यांच्या पगारात दरमहा ७ हजार रुपयांची वाढ करण्यात आली आहे. कामगार क्रांती युनियनचे नेते अशोक जानराव यांच्या पाठपुराव्यामुळे हा तोडगा निघाला आहे.
महाविद्यालयातील नॉन-टीचिंग कर्मचाऱ्यांनी वेतनवाढीची मागणी करत आंदोलनाचा इशारा दिला होता. यासंदर्भात कामगार संघटना आणि महाविद्यालय प्रशासन यांच्यात अनेक फेऱ्यांच्या चर्चा झाल्या. मात्र सुरुवातीला कोणताही तोडगा न निघाल्याने कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण होते. माजी खासदार प्रितम मुंडे यांनी वेतनवाढीचे निर्देश दिल्यानंतरही प्रशासनाकडून निर्णय लांबणीवर टाकला जात असल्याने कामगार नेते अशोक जानकर यांनी कामगार आयुक्त मंगेश झोले यांच्याकडे दाद मागितली.
यानंतर कामगार आयुक्त कार्यालयाच्या मध्यस्थीने झालेल्या बैठकीत कामगार संघटना व महाविद्यालय प्रशासन यांच्यात सविस्तर चर्चा होऊन तडजोडीचा मार्ग स्वीकारण्यात आला. या चर्चेनंतर कर्मचाऱ्यांच्या वेतनात दरमहा ७ हजार रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी माजी खासदार प्रितम मुंडे यांच्याशीही दूरध्वनीवरून चर्चा करण्यात आली.
कामगार नेते अशोक जानराव यांनी या निर्णयाचे स्वागत करत कर्मचाऱ्यांच्या एकजुटीमुळे आणि सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हा विजय मिळाल्याचे सांगितले. वेतनवाढीमुळे कर्मचाऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार असून दीर्घकाळ प्रलंबित असलेला प्रश्न मार्गी लागल्याचे त्यांनी नमूद केले.
Post Views: 43