
सोलापूर – लिटिल चॅम्प बारा वर्षाखालील क्रिकेट स्पर्धेत सकाळच्या सत्रात झालेल्या पहिल्या सामन्यात चंदू पवार संघाने वासू मुदियार संघावर ४ गडी राखून मात केली. दुपारच्या सत्रात झालेल्या दुसऱ्या सामन्यात सातोसकर संघाने चंदू खाडिलकर संघावर ३४ धावांनी शानदार विजय मिळवला.
जुळे सोलापूर येथील भंडारी मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत नाणेफेक जिंकून चंदू पवार संघाने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना वासू मुदियार संघाचा डाव २४.१ षटकांत अवघ्या ७२ धावांवर आटोपला. त्यांच्या अरविंद तेगेलीने १८ आणि नील कोंडाने १० धावा केल्या. चंदू पवार संघाकडून आर्यन जाधवने ३ बळी घेतले, तर शिवम आणि अवनीक लिंगशेट्टी यांनी प्रत्येकी २ बळी, आणि निहाल सका व फराहन यांनी प्रत्येकी १ बळी घेतला.
प्रत्युत्तरादाखल खेळताना चंदू पवार संघाने १४ षटकांत ६ बाद ७६ धावा करत विजय मिळवला. चिराग चव्हाणने २३ आणि सुरजने २० धावांचे योगदान दिले. वासू मुदियार संघाकडून विराज होसमानी, अथर्व पाटील, सुजल भांडेकर, मानस जयस्वाल आणि शिवराज चट्टे यांनी प्रत्येकी १ बळी घेतला. उत्कृष्ट गोलंदाजीसाठी आर्यन जाधवला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले. या सामन्यात प्रदीप कुलकर्णी व अशोक डोंबावळे यांनी पंच म्हणून तर प्रथमेश देगावकर यांनी गुणलेखक म्हणून काम पाहिले.
दुपारच्या सत्रात सातोस्कर संघाने अब्दुल्लाह शेखच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर चंदू खाडिलकर संघाचा ३४ धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना सातोस्कर संघाने २७.४ षटकांत १७० धावा उभारल्या होत्या. १७१ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना चंदू खाडिलकर संघाचा डाव २७.१ षटकांत १३६ धावांवर संपुष्टात आला.
सातोस्करच्या अब्दुल्लाह शेखने फलंदाजीत १४ धावा (२६ चेंडू, २ चौकार) केल्या आणि नंतर गोलंदाजीत ३.१ षटकांत अवघ्या ११ धावा देत ३ महत्त्वपूर्ण बळी घेतले. या उत्कृष्ट अष्टपैलू कामगिरीसाठी त्याला सामनावीर पुरस्कार देण्यात आला.





















