सोलापूर : महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून पुन्हा एकदा प्लास्टिक विरोधी कारवाई मोहीम हाती घेण्यात आली असून दिवसभरात विविध दुकानांची तपासणी करून ६ दुकानांवर कारवाई करत तेथून १३ किलो प्लास्टिक साहित्य जप्त करण्यात आले. त्या दुकानदारांकडून ३० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
शहरात रस्त्यांवर आणि चऱ्याच्या ढिगार्यात प्लास्टिक पिशव्यांचा प्लास्टिक साहित्य मोठ्या प्रमाणात आढळून येत असल्याचे निदर्शनास आले आहे. शासनाने प्लास्टिकवरील ठराविक बंदी घातली असून अशा प्लास्टिकची साहित्य सापडणाऱ्या दुकान आणि आस्थापनांवर कारवाई करून त्यांच्याकडून पहिल्यांदा कारवाई केल्यास ५ हजार रुपये, दुसऱ्यांदा कारवाई केल्यास १० हजार आणि तिसऱ्यांदा कारवाई केल्यास २५ हजार रुपयांचा दंड वसूल करण्याचे नियम जारी करण्यात आले आहेत. गेल्या वर्षभरात ही कारवाई मोहीम बंद होती मात्र प्लास्टिक पिशव्या व इतर साहित्याचा वापर मोठ्या प्रमाणात वाढल्याचे निदर्शनास आल्याने महापालिका आयुक्तांनी अशा प्लास्टिक विक्रेत्यांवर आणि प्लास्टिक वापरणाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश घनकचरा व्यवस्थापन विभागाला दिले आहेत.
यानुसार मंगळवारपासून कारवाईची मोहीम विभागाने हाती घेतली आहे. दिवसभरात शहरातील महापालिकेच्या सर्व ८ झोन कार्यालया च्या परिसरात ६९ दुकान आणि आस्थापना तपासण्यात आले. यामधील सहा दुकानांमध्ये सुमारे १३ किलो प्लास्टिक पिशव्या प्लास्टिक साहित्य व वस्तू आढळून आले. ते जप्त करण्यात आले असून एका दुकानावर १० हजार रुपये तर अन्य चार दुकानांवर प्रत्येकी ५ हजार रुपये प्रमाणे २० हजार रुपये असे एकूण ३० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. झोन कार्यालय क्रमांक ३ मधील एका दुकानातून तीन किलो प्लास्टिक पिशव्या जप्त करण्यात आल्या. मात्र दंडात्मक कारवाई न करता त्याला समज देण्यात आल्याचे सांगण्यात आले.
—-