सोलापूर : थकीत भाडे वसुलीसाठी सोलापूर महापालिकेच्या भूमी व मालमत्ता विभागाने कारवाईचा बडगा उगारला आहे. गेल्या पाच दिवसांत थकबाकी न भरलेल्या १६ गाळेधारक आणि मालमत्ताधारकांवर कारवाई करण्यात आली असून, संबंधित गाळे व कार्यालये सील करण्यात आली आहेत. दरम्यान, थकीत भाडे भरण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या अभय योजनेला ३१ ऑक्टोबर २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
महापालिकेच्या भूमी व मालमत्ता विभागाकडून आर्थिक वर्ष २०२६-२७ साठी अभय योजना राबविण्यात येत आहे. या योजनेतून थकीत भाडे भरण्याची संधी देण्यात आली आहे. योजनेच्या अटी, पात्रता, भरणा प्रक्रिया आणि देयकांतील त्रुटींबाबत माहिती घेण्याचे आवाहनही प्रशासनाने केले होते. मात्र, गाळेधारक आणि खुल्या जागांच्या भाडेपट्टाधारकांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने प्रशासनाने थेट कारवाई सुरू केली आहे.
थकीत रक्कम न भरल्यास गाळे सील करणे आणि आवश्यकतेनुसार ताबा घेण्याची कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा यापूर्वीच देण्यात आला होता. त्यानंतरही थकबाकीदारांनी भरणा न केल्याने महापालिकेच्या पथकाने सीलिंगची कारवाई केली.
गोल्डफिंच पेठेत सर्वाधिक थकबाकी
महापालिकेने केलेल्या कारवाईत गोल्डफिंच पेठेतील गिरीश एम. जानी यांच्याकडे ५ लाख ८१ हजार २९३ रुपये, लक्ष्मण भीमराव चव्हाण यांच्याकडे ४ लाख २२ हजार ७७१ रुपये, शक्ती बहुउद्देशीय संस्थेकडे ६ लाख ५३ हजार ४२४ रुपये, गौस नबीलाल पटेल यांच्याकडे ३ लाख ५३ हजार २७५ रुपये आणि अ. रहिमान अकबर शेख यांच्याकडे २ लाख १९ हजार ३३७ रुपये थकबाकी आहे.
रेल्वे लाईन येथील शांताबाई रामचंद्र आसादे यांच्याकडे ३ लाख ४९ हजार ४५६ रुपये, मंगळवार बाजार येथील अनसूया दगडू जाधव यांच्याकडे ३ लाख ९४ हजार ८३४ रुपये, तर कुंभार वेस येथील लक्ष्मीबाई रामय्या कोळी यांच्याकडे २ लाख २० हजार ४०५ रुपये थकीत आहेत.
साखर पेठेतील भारतरत्न शिक्षण व समाजसेवा, देसाई यांच्याकडे २ लाख ९ हजार १३४ रुपये थकबाकी असून, त्यांचे कार्यालय सील करण्यात आले आहे. बेगम पेठेतील जोहरावी फक्रोद्दीन मुजावर यांच्याकडे १ लाख ८५ हजार ७४८ रुपये थकबाकी आहे. तसेच शकील अलीशेर कलबुर्गी, इलियास अ. शुकूर तुरुप आणि मो. हनिफ अ. कादर शेख यांच्याकडे प्रत्येकी ४७ हजार ५७० रुपयांची थकबाकी, तर जावीद अल्लाबक्ष खरादी यांच्याकडे ४७ हजार ५७० रुपये थकीत आहेत.जुना पुना नाका येथील अर्जुन कृष्णात सुरवसे यांच्याकडे सर्वाधिक ९ लाख ७४ हजार ८२ रुपये, तर शिला आप्पाराव पोखरकर यांच्याकडे ५४ हजार ९८५ रुपये थकबाकी आहे.
रक्कम भरताच गाळे खुले
कारवाईनंतर काही मालमत्ताधारकांनी थकीत भाड्याची संपूर्ण रक्कम भरल्याने त्यांचे गाळे पुन्हा उघडून देण्यात आले आहेत. त्यामुळे संबंधित गाळेधारक आणि खुल्या जमिनीच्या भाडेपट्टाधारकांनी थकीत रक्कम तातडीने भरून अभय योजनेचा लाभ घ्यावा, तसेच सीलिंगसह पुढील कायदेशीर कारवाई टाळावी, असे आवाहन अतिरिक्त आयुक्त वीणा पवार यांनी केले आहे.
—-
Views: 49