सोलापूर : दिवाळीत फटाके विक्रीच्या स्टॉलची संख्या मर्यादित ठेवण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. त्यानुसार पार्क स्टेडियम समोर १५, तर सावरकर मैदानावर १० स्टॉलना परवानगी दिली जाणार आहे. उर्वरित स्टॉल होम मैदानावर उभारण्यात येणार आहेत. मैदानांची क्षमता, अग्निसुरक्षा आणि नागरिकांची सुरक्षितता लक्षात घेऊन क्षमतेपेक्षा अधिक स्टॉल उभारता येणार नाहीत. दरम्यान, पुढील वर्षापासून शहरातील सर्व फटाके स्टॉल होम मैदानावर स्थलांतरित करण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती महापौर विनायक कोंड्याल यांनी दिली.
महापौर विनायक कोंड्याल यांच्या अध्यक्षतेखाली महापौर कार्यालयात फटाके स्टॉल असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीस उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, सभागृह नेते नरेंद्र काळे, भाजप शहराध्यक्ष तथा नगरसेविका रोहिणी तडवळकर, अतिरिक्त आयुक्त वीणा पवार, पोलीस उपायुक्त विजयालक्ष्मी कुरी, नगर अभियंता नीलकंठ मठपती, अग्निशमन विभागप्रमुख राकेश साळुंखे यांच्यासह सुनील रसाळे, बसवराज येरटे, गौरव बेंद्रे, अनिल सावंत, सुनील कत्ते, सन्मित्र काटकर, बाळासाहेब दर्गोपाटील, मनोज जगताप, सुरेश चंद्रगुप्ता, माऊली भोजरंगे, गणेश साठे, अंकिता भुजंग आणि गणेश घाडगे आदी उपस्थित होते.
या बैठकीत स्टॉलची संख्या, आवश्यक सुविधा, अग्निसुरक्षेचे नियम आणि भविष्यातील नियोजनावर चर्चा करण्यात आली.दरवर्षी फटाके स्टॉलच्या संख्येत दोन ते तीनने वाढ होत असल्याने उपलब्ध जागेवर ताण येत आहे. शासनाच्या नियमांनुसार स्टॉलमध्ये सुरक्षित अंतर ठेवणे आवश्यक आहे. मात्र, गर्दीच्या ठिकाणी स्टॉलची संख्या वाढल्यास आग किंवा अन्य दुर्घटना घडून जीवितहानी होण्याचा धोका आहे. त्यामुळे संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी स्टॉलच्या संख्येवर नियंत्रण ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.
मैदानाच्या क्षमतेनुसारच स्टॉलना परवानगी दिली जाईल. अग्निशमन दलाच्या वाहनांना घटनास्थळी पोहोचण्यासाठी पुरेशी जागा उपलब्ध असणे आवश्यक आहे. तसेच स्टॉलधारकांना मूलभूत सुविधा आणि नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने योग्य व्यवस्था उपलब्ध करून देण्यावर भर दिला जाणार आहे, असे महापौर कोंड्याल यांनी स्पष्ट केले.
फटाके स्टॉल्स असोसिएशन देणार महापालिकेकडे यादी
स्टॉलची संख्या वाढत असल्याने जागेच्या क्षमतेचा प्रश्न निर्माण होत आहे. यावर उपाय म्हणून असोसिएशनने पार्क स्टेडियम समोरील जागेवरील १५ आणि सावरकर मैदान येथील १० स्टॉलधारकांची यादी असोसिएशनने महापालिकेला सादर करावी, असे निर्देश बैठकीत देण्यात आले. उपलब्ध जागा आणि निश्चित क्षमतेचा विचार करूनच स्टॉलचे वाटप केले जाणार आहे. त्यानुसार पार्क स्टेडियम आणि सावरकर मैदानावरील स्टॉलधारकांना परवानगी दिली जाईल.
यंदा दिलासा, पुढील वर्षापासून होम मैदानावर
फटाके विक्रेत्यांचे आर्थिक नुकसान टाळण्याचाही विचार प्रशासनाने केला आहे. अनेक विक्रेत्यांनी तीन महिने आधीच फटाक्यांचा माल खरेदी केला आहे. त्यामुळे यंदाच अचानक स्थलांतर केल्यास त्यांचे नुकसान होण्याची आणि ग्राहकांची गैरसोय होण्याची शक्यता आहे. यामुळे यंदा दोन्ही मैदानांवर निश्चित संख्येनुसार स्टॉल उभारण्यास परवानगी देण्याचे ठरले.फटाके स्टॉल असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी यंदाच्या निर्णयाला सहमती दर्शविली. तसेच पुढील वर्षापासून शहरातील सर्व फटाके स्टॉल होम मैदानावर हलविण्याच्या नियोजनालाही सहमती देण्यात आली.
—–
Views: 38