धाराशिव – तुळजापूर तालुक्यातील कदमवाडी येथे आयोजित करण्यात आलेल्या सुहासिनी जेवण कार्यक्रमातून तब्बल २४ महिलांना अन्नातून विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कदमवाडी येथील एका कुटुंबात धार्मिक कार्यक्रमानिमित्त ६ एप्रिल रोजी महिलांसाठी सुहासिनी जेवणाचे आयोजन करण्यात आले होते. दुपारी सुमारे ३ वाजता पारंपरिक जेवण दिले गेले. मात्र जेवणानंतर काही तासांतच महिलांना मळमळ, उलट्या, पोटदुखी आणि अशक्तपणा यांसारखे त्रास जाणवू लागले.
रात्री उशिरापर्यंत अनेक महिलांची प्रकृती बिघडत गेल्याने ग्रामस्थांनी तातडीने त्यांना तुळजापूर व धाराशिव येथील रुग्णालयात दाखल केले. एकूण २४ महिलांना उपचारासाठी हलविण्यात आले असून त्यापैकी एका महिलेची प्रकृती गंभीर असल्याने तिला धाराशिव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
सध्या सर्व रुग्णांवर वैद्यकीय उपचार सुरू असून बहुतांश महिलांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली आहे. दरम्यान, या घटनेनंतर आरोग्य विभागाने तातडीने घटनास्थळी धाव घेत अन्नाचे नमुने तपासणीसाठी पाठवले आहेत.
विषबाधेचे नेमके कारण काय याबाबत तपास सुरू असून प्राथमिक अंदाजानुसार अन्न दूषित झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. या प्रकारामुळे गावात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.




















