सोलापूर : अनंत चतुर्दशीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर महानगरपालिकेने केलेल्या नियोजनानुसार शहरातील विविध विसर्जन कुंड आणि संकलन केंद्रांवरून संकलित करण्यात आलेल्या ५७ हजार ५०३ श्री गणेशमूर्तींचे विधिवत विसर्जन करण्यात आले. तीन फुटांवरील मूर्ती तुळजापूर रोड येथील खाणीत विसर्जित करण्यात आल्या. महापौर विनायक कोंड्याल आणि आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांच्या हस्ते खाणीत श्री गणेशमूर्तीचे पूजन व आरती करून विसर्जनाला सुरुवात करण्यात आली.
महापौर कोंड्याल आणि आयुक्त डॉ. ओम्बासे यांच्या उपस्थितीत पूजा झाल्यानंतर ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या!’ असा जयघोष करण्यात आला. त्यानंतर क्रेन आणि होडीच्या सहाय्याने गणेशमूर्तींचे भावपूर्ण वातावरणात विसर्जन करण्यात आले.
महापालिकेने शहरात ११ विसर्जन कुंडे आणि ४८ गणेशमूर्ती संकलन केंद्रे उभारली होती. तुळजापूर रोड खाण, विष्णू घाट, गणपती घाट, घरकुल येथील म्हाडा विहीर यासह विविध ठिकाणी नागरिकांनी मोठ्या संख्येने गणेशमूर्तींचे विसर्जन केले. सर्व ठिकाणी बॅरिकेटीग, मंडप, विद्युत रोषणाई, फ्लेक्स आणि स्पीकरसह आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या.
मूर्ती संकलन व विसर्जनासाठी आठ क्रेन, चार होड्या आणि ५० ते ५५ वाहने तैनात करण्यात आली होती. याशिवाय घंटागाड्या -३०, आरसीएस गाड्या -४, मुख्य आरोग्य निरीक्षक – आठ, आरोग्य निरीक्षक ५५, ३५० सफाई कर्मचारी आणि सुमारे ८०० मजुरांची नियुक्ती करण्यात आली होती. प्रमुख ठिकाणी अग्निशमन वाहने, डॉक्टरांसह रुग्णवाहिकाही सज्ज ठेवण्यात आल्या होत्या.
कंबर तलाव, गणपती घाट आणि हिप्परगा खाण परिसरावर सीसीटीव्हीच्या माध्यमातून विशेष लक्ष ठेवण्यात आले. कायदा व सुव्यवस्था तसेच वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पोलिसांचा विशेष बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. गर्दीच्या ठिकाणी पोलीस पथके आणि वाहतूक शाखेचे अधिकारी-कर्मचारी तैनात होते.
३१ टन निर्माल्य संकलित
पर्यावरण संवर्धनासाठी श्री धर्माधिकारी संस्थेचे १ हजार ८०० स्वयंसेवक विविध विसर्जन स्थळी कार्यरत होते. त्यांच्या माध्यमातून ३१ टन निर्माल्य संकलित करण्यात आले. भाविकांना निर्माल्य स्वतंत्रपणे जमा करण्याचे आवाहन करण्यात आले. या उपक्रमाबद्दल महापौर विनायक कोंड्याल आणि आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी संस्था व स्वयंसेवकांचे आभार मानले.
महापौर कोंड्याल म्हणाले, ‘सामाजिक संस्थांच्या सहकार्यामुळे पर्यावरणपूरक उपक्रम अधिक प्रभावीपणे राबविता येतात. स्वयंसेवक आणि महापालिका कर्मचाऱ्यांच्या संयुक्त प्रयत्नांतून निर्माल्य व्यवस्थापन व्यवस्थित झाले असून नागरिकांनीही सहकार्य केले.’
यावेळी अतिरिक्त आयुक्त वीणा पवार, अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, सहायक आयुक्त मनीषा मगर, नगर अभियंता नीलकंठ मठपती, कार्यकारी अभियंता विद्युत राजेश परदेशी, मुख्य सफाई अधीक्षक अनिल चराटे, उपअभियंता अविनाश वाघमारे, विभागीय अधिकारी बक्षी, विभागीय अधिकारी विजय लोखंडे तसेच सर्व विभागीय अधिकारी उपस्थित होते.
ठळक आकडेवारी अशी –
* संकलित गणेशमूर्ती — ५७,५०३
* विसर्जन कुंडे – ११
* मूर्ती संकलन केंद्रे — ४८
* संकलित निर्माल्य – ३१ टन
* धर्माधिकारी संस्थेचे स्वयंसेवक — १,८००
—–
Post Views: 12