हिमाचल प्रदेशात मान्सून दाखल झाल्यापासून सार्वजनिक पायाभूत सुविधांचे एकूण 8,014.61 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. राज्यातील कुल्लू येथे भूस्खलनामुळे अनेक घरे कोसळली आहेत. डोंगराळ भागात झालेल्या प्रचंड भूस्खलनात कोसळलेल्या इमारती आणि घरांच्या ढिगाऱ्यात अनेक लोक अडकल्याचा संशय आहे.
हिमाचल प्रदेशातल्या भूस्खलनाचा एक व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये डोंगराला तडे गेल्याने आसपासची घरे कशी कोसळली हे दिसत आहे. भूस्खलनाच्या दृश्यांमध्ये अनेक बहुमजली इमारती कोसळताना दिसत आहेत. भारतीय हवामानशास्त्र विभागाने आजपासून पुढील दोन दिवस हिमाचल प्रदेशात मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी केला आहे.राज्यात अनेक ठिकाणी पावसाची संततधार सुरू असून, त्यामुळे नागरिकांना पाऊस, पूर आणि भूस्खानाचा सामना करावा लागत आहे.
पोलिस अधिकारी साक्षी वर्मा यांनी सांगितले की, मुसळधार पावसामुळे खराब झालेल्या कुल्लू-मंडी महामार्गावर आज शेकडो वाहने अडकून पडली आहेत. कुल्लू आणि मंडीला जोडणारा रस्ता खराब झाला आहे. पंडोह मार्गे पर्यायी मार्गाचेही नुकसान झाले आहे. त्यामुळे सध्या वाहतूक ठप्प आहे. सततच्या पावसाने पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील डोंगराळ राज्य असलेल्या हिमाचल प्रदेशात भूस्खलन, ढगफुटी आणि अचानक आलेल्या पुरामुळे मोठ्या प्रमाणावर विध्वंस झाला आहे.
राज्य सरकारने यापूर्वी संपूर्ण राज्याला ‘नैसर्गिक आपत्तीग्रस्त क्षेत्र’ म्हणून घोषित केले होते आणि बाधित लोकांना मदत देण्याचे काम सुरू केले आहे. यावर्षी मुसळधार पावसामुळे एकूण 709 रस्ते बंद झाले आहेत. राज्यामध्ये मान्सून दाखल झाल्यापासून 24 जूनपासून सार्वजनिक पायाभूत सुविधांचे एकूण 8,014.61 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचे राज्य सरकारने सांगितले. सरकारच्या आकडेवारीनुसार, पावसामुळे राज्यात 2,022 घरांचे पूर्ण नुकसान झाले असून 9,615 घरांचे अंशत: नुकसान झाले आहे. राज्यात 113 भूस्खलनाचीही नोंद झाली आहे, ज्यामुळे पायाभूत सुविधांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे आणि हजारो लोक बेघर झाले आहेत.सरकारी आकडेवारीनुसार पावसामुळे 224 जणांचा मृत्यू झाला, तर पावसाशी संबंधित अपघातांमध्ये 117 लोक मृत्यूमुखी पडले आहेत.