सोलापूर : “स्पर्धा परीक्षा ही एका दिवसात जिंकली जाणारी लढाई नसून सातत्यपूर्ण अभ्यास, योग्य नियोजन, संयम आणि चिकाटी यांची दीर्घकालीन कसोटी आहे. कोणत्याही माध्यमातून शिक्षण घेतले असले तरी आत्मविश्वास, सकारात्मक दृष्टिकोन आणि नियमित परिश्रम यांच्या बळावर प्रत्येक विद्यार्थ्याला स्पर्धा परीक्षेत यश मिळविता येते,” असे प्रतिपादन मुंबई येथील सहाय्यक आयुक्त तथा विक्रीकर निरीक्षक संपदा वांगे यांनी केले.
वालचंद कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्स आणि हिराचंद नेमचंद कॉलेज ऑफ कॉमर्स यांच्या संयुक्त विद्यमाने स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रातर्फे आयोजित विशेष व्याख्यानात त्या बोलत होत्या. स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळविण्यासाठी अभ्यासाचे नियोजन, वेळेचे प्रभावी व्यवस्थापन आणि अद्ययावत घडामोडींचे ज्ञान अत्यंत महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले. अपयश आले तरी खचून न जाता त्यातून शिकत सातत्याने प्रयत्न सुरू ठेवावेत, असा सल्लाही त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.
अध्यक्षस्थानी प्रा. शिवकुमार बिरादार होते. अध्यक्षीय भाषणात त्यांनी स्पर्धा परीक्षांचा वाढता आवाका लक्षात घेता विद्यार्थ्यांनी नियमित अभ्यास, कठोर परिश्रम आणि सातत्य या त्रिसूत्रीचा अंगीकार करणे आवश्यक असल्याचे सांगितले. महाविद्यालयातील स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र विद्यार्थ्यांना योग्य दिशा, प्रेरणा आणि मार्गदर्शन देण्यासाठी सातत्याने विविध उपक्रम राबवत असल्याचेही त्यांनी नमूद केले.
प्रारंभी प्रास्ताविक प्रा. डॉ. संगमेश्वर निला यांनी केले. प्रमुख वक्त्यांचा परिचय डॉ. भागवत गजधाने यांनी करून दिला. सूत्रसंचालन डॉ. पद्मावती पाटील यांनी केले, तर आभार डॉ. अमोल शिंदे यांनी मानले.
यावेळी प्रा. डॉ. सिद्राम सलवदे, प्रा. हनुमंत मते, डॉ. गोविंद तोडकरी, डॉ. रामचंद्र गोरे, डॉ. महावीर साबळे, डॉ. दत्तात्रय कांबळे, डॉ. परमेश्वर कमळे, डॉ. दीपाली राजमाने, प्रा. संगीता माळी यांच्यासह प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाला विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
Post Views: 22