खासगी इंग्रजी माध्यमांच्या शाळांशी स्पर्धा करून आपल्या शाळेतील मुलांची पटसंख्या टिकावी व वाढावी, यासाठी गुणवत्तेसाठी प्रयत्न सुरू असतानाच शिक्षकांना शाळाबाह्य मुलांसह आता निरक्षरांचा सर्व्हे आणि दरवर्षी मतदार नोंदणी आणि निवडणूक ड्यूटी, अशा जबाबदाऱ्या त्यांना पार पाडाव्या लागत आहेत. राष्ट्रीय कर्तव्य पार पाडण्याची जबाबदारी प्रत्येकाचीच आहे, पण भविष्यातील पिढी गुणवत्तापूर्ण घडविणाऱ्या शिक्षकांवर अतिरिक्त बोजा नको, असा सूर निघू लागला आहे.
उत्कृष्ट काम करणाऱ्या शिक्षकांना राष्ट्रीय, राज्य, जिल्हा, तालुका स्तरावर गौरविले जाते. आपली मुले क्रीडा स्पर्धेत, शिष्यवृत्ती परीक्षेत, इतर इंग्रजी माध्यमांमधील मुलांच्या तुलनेत अधिक दर्जेदार व्हावीत, यासाठी शिक्षकांच्या माध्यमातून प्रत्येक शाळेचा प्रयत्न असतो. मात्र, २०-२५ वर्षांपूर्वीचा काळ आणि सध्याची स्थिती खूपच बदलली आहे.एकेकाळी शारीरिक शिक्षण व मूल्यशिक्षण हे विषय विद्यार्थ्यांच्या आवडीचे, तसे शिक्षकही विद्यार्थ्यांकडून विविध खेळांची तयारी करून घ्यायचे. त्यातूनच देशाला अनेक खेळाडू मिळाले. सध्या मात्र ते विषय केवळ नावालाच असल्याची स्थिती आहे. शिक्षकांना पुरेसा वेळ मिळाल्यास ते दिवस पुन्हा येतील, पण अतिरिक्त कामामुळे अनेकांना ते शक्य होत नसल्याचीही ओरड आहे.
















