सोलापूर – अवध्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या श्री विठू माऊलीच्या कार्तिकी ( प्रबोधिनी) एकादशी निमित श्रीशुभराय महाराज मठातून सवाद्य रथोत्सव मिरवणूक काढण्यात आली. भगवा पताकासह डोक्यावर तुळशीवृंदावन घेऊन महिलांनी बँडच्या तालावर विठूनामाचा गजर केला. रविवारी दुपारी ठीक साडेबारा वाजण्याच्या सुमारास श्रींचा लाकडी रथ श्री शुभराय मठातून मिरवणूकीसाठी बाहेर काढण्यात आला. मुखी हरिनामाचा गजर करत अनेक भाविकांनी दोरखंडाद्वारे रथ ओढत मिरवणूक मार्गस्थ केली.
दरम्यान, १७८५ पासून निघालेल्या रथयात्रेचे हे यंदाचे २४० वे वर्ष आहे. ही रथयात्रा वारकरी पंथांचीची बिजे सोलापूरात रोवण्यासाठी श्री शुभराय महाराजांनी १७८५ रोजी आषाढी एकादशीला आलेल्या विठुरायासाठी सवाद्य रथयात्रा सुरु केली. त्यासाठी गुरुदिन कलवार यांनी शुभरायांच्या मार्गदर्शनाखाली तीन मजली दुमडता येणारा रथ तयार करुन दिला. दशमीला देवाचे नवरात्र संपले. सायंकाळी रथाच्या मानकऱ्यांनी रथाची बांधणी करून प्रसाद घेतला. नेहमीप्रमाणे सकाळी पावणे सहा ते सात या वेळात काकडा झाला.
या काकड्यातूनच भगवंत त्यांच्या योगनिद्रेतून उठले. साडे सात वाजता पौरोहित्य करणारे श्री पांडुरंग उपाध्ये यांनी अकरा गुरुजींच्या सहकार्याने विठुराया आणि भगवान श्रीकृष्णाचा पौमानाचा अभिषेक केला. यावेळी अनेकांनी भगवंतास अभिषेक घातला. साडे दहा वाजता भगिनींनी भजन केले. दुपारी १२ वाजता महाआरती होऊन रथयात्रा सुरु झाली. विठुरायाच्या गजरात महिला झिम्मा फुगडी खेळत, उंच उंच झेंडे उडवत, ही रथयात्रा सर्वांना दर्शन देत, सायंकाळी मठात आली. पुन्हा महाआरती होऊन, आलेल्या सर्वांना प्रसाद म्हणून उपवासाचा फराळ देण्यात आला.

यारथयात्रेचे नेतृत्व श्रीमती शुभांगी बुवा यांनी केले. रथाची संपूर्ण जबाबदारी रथाचे मानकरी यंदे, गवळी, गुमाते, चव्हाण, छत्रबंद, काटकर, होणकलस, नवगिरे, संजय दास इत्यादींनी आणि त्यांच्यासोबत त्यांच्या परिवारातील लहान मुलांनी समर्थपणे पेलली. तसेच फुलांची सजावट रियाज शेख यांचे कुटुंब आणि माईक व स्पीकरची व्यवस्था अबुल शेख या मुस्लिम बांधवांनी केली.
भगवंताची महाआरती अमृता व श्री ऋतूराज बुवा यांनी केली. रथयात्रेमध्ये पालखीची जबाबदारी नेहमीप्रमाणे भावे बंधू आणि खिलारे बंधूंनी पेलली. या रथयात्रेत शोभना सुहास परिचारक, मठात रोज काम करणारे सर्व पुजारी, पाखर संकुलच्या यशोदामाता, संयोगिता काकडे, मंजुषा बारकूल आणि त्यांच्या सख्या, उद्योगवर्धिनीच्या गितांजली चौहान, प्रवीण देशमुख, ध्रुव कांबळे सहभागी झाले.
रस्त्याच्या दुतर्फा भाविकांची गर्दी जमली होती. भक्तांनी हा भगवंताचा रथ ओढला. या मिरवणुकीत बँड, ढोलताशा, अभंग गायन यांनी सर्वत्र उत्साह निर्माण केल्याचे दृश्य पहावयास मिळाले.
फोटो ओळ – कार्तिक एकादशीनिमित्त श्री शुभराय मठातून भाविकांनी ओढला श्रींचा रथ तर महिलांनी धरला फुगडीचा फेर

















