पंढरपूर – कार्तिकी यात्रे निमित्त विठ्ठलाच्या दर्शनासाठी येथे आलेल्या लाखो वैष्णवांनी एकादशीचा अनुपम्य सोहळा डोळेभरुन अनुभवत परंपरंने घराण्यातून चालत आलेली वारी पोहच केली. विठुरायाच्या भेटीला पुढच्या वर्षी येण्याची मनोमन इच्छा व्यक्त करुन मोठ्या जड अंतकरणाने वारकरी पंढरीचा आज निरोप घेत होते. येथील बस तसेच रेल्वे स्थानकावर पहाटे पासूनच भाविकांची परतीच्या प्रवासासाठी मोठी गर्दी झालेली होती. यावर्षी पावसाने संपूर्ण राज्यात अक्षरशः धुमाकूळ घातल्यामुळे तसेच अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाल्यामुळे शेतकरी आणि नागरिकांचे प्रचंड नुकसान झाले. याचा परिणाम यंदाच्या कर्तिक यात्रेवर झाला. कार्तिकी यात्रे मध्ये वारकऱ्यांची संख्या खूपच कमी जाणवली. त्यामुळे एकंदरीतच व्यापारावर त्याचा मोठा परिणाम झाला. वारी फेल गेल्यामुळे स्थानिक व्यापारी मात्र चिंतेत दिसत आहेत.
दरम्यान पहाटे पासूनच भाविकांची परतीच्या प्रवासासाठी वारकऱ्यांची लगबग दिसत होती. येथील चंद्रभागा वाळवंटा मध्ये भाविकांची मध्यरात्री पासूनच स्नानासाठी गर्दी झालेली होती. चंद्रभागेचे पवित्र स्नान आणि नगरप्रदक्षिणा करुन व्दादशीच्या न्हाहरीची वारकऱ्यांची लगबग सुरु होती. अनेक मठ,धर्मशाळांमधून वारकऱ्यांच्या जेवणाच्या पंक्ती बसत असल्याचे दृश्य पहावयास मिळत होते.
वारकरी व्दादशी सोडून सामानाची बांधाबांध करुन मुक्कामाच्या ठिकाणाहून बाहेर पडत थेट विठ्ठल मंदिराचे कळस दर्शन घेवुन रेल्वे,एस.टी तसेच खासगी वाहनांमधून बसुन जातो माघारी पंढरीनाथा । तुझे दर्शन झाले आता ।। या भावनेने मोठ्या जड अंत:करणाने परतीच्या प्रवासासाठी रवाना होत होते.
————————
पुढच्या वर्षी भेटीला येण्यासाठी बळ दे –
बोला पुंडलिक वरदे हरि विठ्ठल । श्रीज्ञानदेव तुकाराम ।। पंढरीनाथ भगवान की जय ।।। असा जयघोष करीत येथील विठ्ठल मंदिराच्या पश्चिमव्दारात तसेच महाव्दारात उभे राहून दोन्ही हातने स्वत:चे कान पकडून वारकरी विठ्ठल विठ्ठल म्हणून उड्या मारीत सावळ्या परब्रम्हाकड़े क्षमा याचना करुन काही चुकले असेल तर माफी कर, पुढच्या वर्षी तुझ्या भेटीला येण्यासाठी बळ दे असे म्हणत त्याचा निरोप घेत होते. या वेळी एकीकडे वारी पोहचल्याचा आनंद तर दुसरीकडे निरोप घेताना झालेली त्यांची अवस्था त्यांच्या डोळ्या खालील पापण्याच्या ओलाव्या वरुन स्पष्ट जाणवत होती.
—————————–
वारी फेल पुढील आर्थिक नियोजना बद्दल चिंता –
या वर्षी राज्याच्या विविध भागात झालेला मुसळधार पाऊस आणि पावसामुळे अनेक ठिकाणी निर्माण झालेली पूरपरिस्थिती यामुळे ग्रामीण भागात शेतकऱ्यांचे तसेच शहरी भागात नागरिकांचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे कार्तिकी यात्रेवर याचा मोठा परिणाम झाला. प्रशासनाने यावर्षी आठ ते नऊ लाख भाविक असा अंदाज बांधला होता. मात्र प्रत्यक्षात चार ते पाच लाख यात्रा कशीबशी भरल्याचे दिसून आले. यात्रेमध्ये वारकऱ्यांची संख्या कमावलीची रोडावल्याने आर्थिक उलाढालीवर त्याचा मोठा परिणाम झाला. वारी फेल गेल्या मुळे पुढील आर्थिक नियोजन कसे करायचे या बद्दल येथील स्थानिक व्यापाऱ्यांनी चिंता व्यक्त केली.
———————————
फोटोओळी : पंढरपूर : कार्तिकी यात्रा पोहच करुन आपल्या गावाकडे परत जाण्यासाठी वारकरी भाविकांनी येथील रेल्वे स्टेशनवर सोमवारी पहाटे पासून मोठी गर्दी केलेली होती.


















