माळशिरस – नुकताच साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू झालेला आहे. गळीत हंगाम सुरू झाल्यानंतर ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर ट्रेलर, ट्रॅक्टर गाडी, बैलगाडी, ट्रक इत्यादी ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांच्या वर्दळीमुळे रस्ते अपघातात वाढ होण्याची शक्यता लक्षात घेऊन त्यावर उपाययोजना म्हणून अकलूज उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने रस्तासुरक्षा पाऊले उचलली असल्याची माहिती . उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून देण्यात आली.
कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या सर्व 15 साखर कारखान्यांना रस्ता सुरक्षा सूचनांचे पालन करण्याबाबतचे सविस्तर सूचनापत्र कारखान्यावर अधिकाऱ्यामार्फत प्रत्यक्ष भेट देऊन तातडीने देण्यात आले आहे. तसेच ऊस वाहतूक करणाऱ्या चालकांनी काय खबरदारी घ्यावी याबाबत सचित्र फलक सर्व कारखान्यावरील वजन काटा, प्रवेशद्वार यासारख्या महत्त्वाच्या ठिकाणी वायुवेग पथकातील अधिकारी व चालक यांचेकडून भेट देऊन बसविण्यात आलेले आहेत.
सर्व कारखान्यांचा गळीत हंगाम सुरक्षितपणे पार पडण्यासाठी ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांनी रिफ्लेक्टर बसवावेत, वाहन नादुरुस्त झाल्यास ते तत्काळ मुख्य रस्त्याच्या बाजूला करावे, वाहनावर मोठे स्पीकर्स लावून कर्णकर्कश आवाजात गाणी ऐकत वाहन चालवू नये, मोबाईलवर बोलत तसेच दारू पिऊन वाहन चालवू नये , अनेक अंतरापर्यंत एका मागे एक सलग वाहन चालू नये इत्यादी महत्त्वाच्या बाबींचा उल्लेख सचित्र फलकांवर करण्यात आलेला आहे.
या महत्त्वाच्या सूचनांची सूचनांची अंमलबजावणी कारखाना प्रशासनाने करून घ्यावी याबाबत सूचना पत्राद्वारे व प्रत्यक्ष भेटून दिलेल्या आहेत. साखर कारखान्यांचा गळीत हंगाम पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यानंतर वेळोवेळी प्रत्येक कारखान्यावर सुरक्षा शिबिर आयोजित करून सर्व चालकांना रस्तासुरक्षा मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अमरसिंह गवारे यांच्या आदेशाने आणि ARTO अश्विनकुमार पोंदकुले आणि संभाजी गावडे यांच्या मार्गदर्शनानुसार मोटार वाहन निरीक्षक समीर सय्यद , रमेश सातपुते, सचिन झाडबुके, संदीप पाटील , मयूर भोसेकर, वैभव राऊत, अमित कराड, नंदकुमार सावंत, शिवप्रसाद मवाळ, अमोल घुले तसेच सर्व सहायक मोटर वाहन निरीक्षक अश्विनी जगताप, अर्चना दराडे , सुषमा गुणवरे, अशोक इंगोले, रणजीत शेजाळ, प्रणय पाटील व इतर तसेच कार्यालयाचे सर्व वाहन चालक यांनी ही कामगिरी पार पाडली आहे.

















