सांगोला – दरवर्षी प्रमाणे विटा शहरात गवळी प्रतिष्ठानच्या वतीने विटा महोत्सवात विविध कार्यक्रमाबरोबरच राज्यस्तरीय सौंदर्यवती स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धेत सांगोल्यातील सायली कांबळे हिने प्रथम क्रमांक पटकावला. या स्पर्धेत ४० सौंदर्यवतींनी सहभाग नोंदवला होता.
सदर स्पर्धेत सायली कांबळे हिची नीलम बाबर यांनी रंगभूषा व वेशभूषा केले होती. स्पर्धेत सायली कांबळे हिने उत्कृष्ट सादरीकरण करून प्रथम क्रमांकाचे सौंदर्यवती पारितोषिक ११ हजार रुपये व सन्मान चिन्ह प्राप्त केले. त्यांच्या यशाबद्दल आमदार सुरेश खाडे व गवळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष नितीन गवळी यांचे हस्ते सन्मान करण्यात आला.

सायली कांबळे ही मिशन हॉस्पिटल, मिरज येथे वैद्यकीय शिक्षण घेत असून सांगोला महाविद्यालयाचे प्रा.डॉ. विधीन कांबळे यांची ती कन्या आहे. सायली कांबळे आणि नीलम बाबर यांचे या यशाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.

















