छत्रपती संभाजीनगर – महाराष्ट्र राज्याच्या औद्योगिक विकासाच्या दिशेने आणखी एक महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. व्हिएतनाममधील प्रसिद्ध इलेक्ट्रिक वाहन उत्पादक कंपनी विनफास्ट (VinFast) लवकरच महाराष्ट्रात आपला इलेक्ट्रिक वाहन निर्मिती प्रकल्प सुरू करण्याच्या तयारीत आहे.
विनफास्ट आशियाचे कार्यकारी अध्यक्ष फॅम सॅन चौ यांनी नुकतीच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सौजन्यभेट घेतली. या भेटीत राज्यात इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रात गुंतवणूक करण्याच्या आणि दीर्घकालीन औद्योगिक भागीदारी स्थापन करण्याच्या शक्यता चर्चिल्या गेल्या.
विनफास्ट कंपनीने अलीकडेच भारतात तामिळनाडूमध्ये आपला पहिला उत्पादन प्रकल्प सुरू केला आहे. त्यानंतर कंपनीने महाराष्ट्रातील औद्योगिक वातावरण, धोरणात्मक स्थान आणि सक्षम पायाभूत सुविधा लक्षात घेऊन राज्यात गुंतवणुकीचा विचार सुरू केला आहे.
या प्रकल्पासाठी बिडकीन डीएमआयसी (Bidkin DMIC) औद्योगिक क्षेत्राला प्राधान्य मिळण्याची शक्यता आहे. बिडकीन DMIC ने आपल्या अधिकृत सोशल मीडिया माध्यमांवर विनफास्ट कंपनीच्या या निर्णयाचे स्वागत करत, महाराष्ट्रात नव्या औद्योगिक संधी निर्माण होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे.
उद्योग विभाग, महाराष्ट्र शासन राज्यात हरित ऊर्जा, इलेक्ट्रिक वाहन निर्मिती आणि शाश्वत औद्योगिक विकासाला प्रोत्साहन देण्याच्या दिशेने सातत्याने प्रयत्नशील आहे. विनफास्टसारख्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कंपनीच्या सहभागामुळे महाराष्ट्र ‘ई-मोबिलिटी हब’ बनण्याच्या दिशेने आणखी एक पाऊल पुढे टाकत आहे.



















