सोलापूर – सौंदर्य फक्त डोळ्यांनी पाहता येते, पण दया (करूणा) ही पाहण्याची गोष्ट नसून ती प्रत्यक्ष करण्याची गोष्ट आहे. दया हेच खरे आणि सर्वात मोठे सौंदर्य आहे, असे प्रतिपादन डॉ. राव यांनी वल्याळ मैदानावर सुरू असलेल्या श्री माता देवी वैभवम विषयावर दुसऱ्या दिवशी आध्यात्मिक प्रवचनात केले. ते म्हणाले की, जर प्रत्यक्ष चालणारा देव पाहायचा असेल, तर शंकराचार्यांचे दर्शन घ्यावे.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते सद्गुरूंचे पूजन करण्यात आले. यावेळी डॉ.राव पुढे म्हणाले की, जगद्गुरु चंद्रशेखर सरस्वती यांचा फोटो आजही प्रत्येक घराघरात दिसतो. यामागे कारण म्हणजे त्यांच्या हृदयात असलेली दया व कृपाळू भाव प्रत्येकाला अनुभवायला मिळतो. ज्यामुळे ते आजही पूजनीय व लोकांच्या स्मरणात आहेत.
डॉ. राव यांनी देवी मातेचे स्वरूप स्पष्ट करताना सांगितले की, देवी मातेला समजून घेण्यासाठी आधी आपल्या आईला समजून घेतले पाहिजे. देवतांचे वर्णन पायापासून डोळ्यांपर्यंत आहे, तर देवी मातेचे वर्णन शास्त्रात केशापासून नखापर्यंत सांगितले आहे. देवीमाता ही साऱ्या जगाची माता आहे, म्हणूनच ललिता सहस्त्रनामावली मध्ये ‘अम्मा’ (आई) नावाने सुरुवात केली जाते.
देवी मातेची कांती सूर्यासारखी असते आणि तिचा लाल रंग बदलाचे संकेत देतो. आत्म्याचा कितीही जन्म प्रवास झाला, तर त्याला बदल म्हटले जाते. पोटातील बाळाची वाढ कशी होते, याचे ज्ञान फक्त आईलाच असते. मानवाच्या आयुष्यात बदल घडविणारी आईच आहे. ‘कुठून आलो, किती जन्म घेतले’ हा सर्व बदल घडवणारी माता देवीच आहे.
व्यासमुनी आणि शंकराचार्यांनी सर्वप्रथम देवी मातेच्या भुजांचे वर्णन करून नंतर देवी मुखाचे वर्णन का केले, याचा अभ्यास आपण केला पाहिजे. त्यांच्यामुळेच आपल्याला कांची कामाक्षी देवी मातेच्या स्वरूपात एक रूप पहायला मिळते, असेही डॉ. राव यांनी नमूद केले.
ज्याप्रमाणे आई स्वतःचे दूध बाळाला पाजून मोठे करते, त्याचप्रमाणे देवी माता सृष्टीचे पालनपोषण करून तिला सुंदर बनवते. झाडे, शाकाहारी आणि मांसाहारी प्राणी यांच्यातील अन्नसाखळीप्रमाणेच, देवी मातेचा आशीर्वाद नसेल, तर अध्यात्म घडू शकणार नाही. हा आशीर्वादच सृष्टीतील सर्व घडामोडी चालवतो.
कार्तिक अमावस्येच्या चंद्रबिंबात देवीचे रूप पाहणाऱ्याला मोक्षप्राप्ती होते. चंद्रबिंब आणि तलावातील कमल पुष्पांकडे पाहून जसे मन प्रसन्न होते, अगदी त्याचप्रमाणे देवी मातेचे मुख मंडल पाहिल्यानंतर मनाला प्रसन्नता लाभते.
शंकराचार्य आणि व्यासमुनी दोघांनीही स्पष्ट केले आहे की, सुख-दुःख भोगण्यासाठी जसे मानवी शरीर आवश्यक आहे, त्याचप्रमाणे कर्माचे चांगले फळ मिळण्यासाठी देवी मातेचा आशीर्वाद महत्त्वाचा आहे. ८४ लाख योनीच्या प्रवासानंतर लाभलेल्या मानवी शरीराचा आणि बोलण्याचा वापर देवी मातेच्या भक्तीसाठी करून तिचा कृपा आशीर्वाद प्राप्त करावा. हात, पाय, डोळे, जीभ या सर्व अवयवांचा वापर चांगल्यासाठी करायला हवा. ज्या व्यक्तीमध्ये भक्ती भाव असतो, ते चांगले काम करतातच. परंतु ज्या व्यक्तीमध्ये चांगला भाव नसतो, तो देखील देवी मातेच्या कृपाशीर्वाधाने चांगले काम करू शकतो. देवी मातेचा आशीर्वाद सर्व काही घडवतो, असे डॉ. राव यांनी यावेळी सांगितले.

















