बार्शी – बार्शी टेबल टेनिस अकॅडमीचा लहानसा पण दमदार खेळाडू राजवर्धन विजयकुमार तिवारी याने पुन्हा एकदा आपली गुणवत्ता सिद्ध करत राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत कांस्य पदकाची कमाई केली आहे. पंचकुला (हरियाणा) येथे ९ ते १६ नोव्हेंबरदरम्यान पार पडलेल्या UTT National Ranking Table Tennis Championship या प्रतिष्ठित राष्ट्रीय स्पर्धेत राजवर्धनने प्रभावी खेळ सादर करत कांस्य पदक पटकावले.
या स्पर्धेचे आयोजन हरियाणा स्टेट टेबल टेनिस असोसिएशनतर्फे करण्यात आले होते, तर या स्पर्धेला टेबल टेनिस फेडरेशन ऑफ इंडिया (TTFI) चे अधिपत्य लाभले होते. विशेष म्हणजे राजवर्धनने यावर्षी दुसऱ्यांदा राष्ट्रीय स्तरावर पदक जिंकण्याची कामगिरी बजावली आहे.
सध्या राजवर्धन हा भारतात तिसऱ्या क्रमांकावर (India Rank– 3) आहे. तो सेंट जोसेफ शाळा, बार्शी येथे इयत्ता तिसरीत शिकत असून, निवृत्त नेव्ही अधिकारी विजयकुमार तिवारी यांचा मुलगा आहे.
गत साडेतीन वर्षांपासून अखंड सराव, शिस्त आणि जिद्दीच्या जोरावर राजवर्धन सतत प्रगती करत आहे. त्याचे प्रशिक्षण कॉमनवेल्थ टेबल टेनिस फेडरेशन सर्टिफाईड कोच गणेश स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली बार्शी टेबल टेनिस अकॅडमी (रोटरी क्लब, सुभाषनगर, बार्शी) येथे होत आहे. इनडोअर सुविधांचा अभाव असूनही, मेहनत आणि इच्छाशक्तीच्या जोरावर त्याने ही भरारी घेतली आहे.
राजवर्धनच्या या उल्लेखनीय यशाबद्दल सोलापूर जिल्हा टेबल टेनिस असोसिएशनचे अध्यक्ष राजीव प्रधान व सचिव झेड. एम. पुणेकर यांनी त्याचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे. बार्शीचा हा छोटा चॅम्पियन आज संपूर्ण महाराष्ट्राचा अभिमान ठरला आहे.

















