वसमत / हिंगोली – नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात नव्या राजकीय चर्चांना उधाण आले आहे.परंतु यावेळी वसमतचा मतदार फक्त नाव, पक्ष किंवा प्रचाराच्या गदारोळाकडे पाहत नाही, तर विचारपूर्वक निर्णय घेण्याच्या तयारीत आहे.कारण जनतेला आता असा नेता हवा आहे जो शहरासाठी बोलेल नाही काम करेल.विशेष म्हणजे, यावेळी नगरसेवकांपेक्षा नगराध्यक्षपदाकडेच नागरिकांचे लक्ष केंद्रित झाले आहे.
शहराच्या भविष्यासाठी योग्य नेतृत्वाची निवड ही वसमतच्या मतदारांसमोरची खरी परीक्षा ठरली आहे.शिक्षण आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष नको वसमत शहरातील शैक्षणिक प्रश्न गंभीर आहेत.शाळा आणि महाविद्यालयांची सुविधा अपुरी, वाचनालये कमी, आणि खेळाच्या संधी मर्यादित.शहराचा विकास केवळ रस्ते आणि नाले बांधण्यात नाही, तर विद्यार्थ्यांना सक्षम बनवण्यात आहे.
हे जनतेने उमेदवारांना स्पष्ट सांगितले आहे.“देशाचे भविष्य म्हणजे विद्यार्थी, आणि शहराचे भविष्य म्हणजे शिक्षण” हा संदेश आता वसमतच्या प्रत्येक कोपऱ्यात ऐकू येतोय. महिला सुरक्षितता आणि सुविधा महत्त्वाच्या महिलांसाठी सुरक्षित वातावरण, हिरकणी कक्ष, सार्वजनिक शौचालये आणि स्वच्छ रस्ते या बाबी आता फक्त मागण्या नसून, मतदानाचे निर्णायक मुद्दे बनल्या आहेत.
महिला वर्गाचं मत ठाम आहे “सुरक्षित शहरासाठी जबाबदार प्रशासन हवं.” स्वच्छ, हरित आणि नियोजनबद्ध वसमतची मागणी नाल्यांचे प्रदूषण, रस्त्यांवरील कचरा आणि वृक्षतोड या समस्या नागरिकांनी अनेकदा अनुभवल्या आहेत.या वेळी मतदार वर्गाने ठरवलं आहे ‘स्वच्छ वसमत’ आणि ‘हरित वसमत’ निर्माण करणाऱ्या नेतृत्वालाच मत!विकासाचा आराखडा केवळ आकड्यांमध्ये नव्हे, तर प्रत्यक्षात दिसावा, ही नागरिकांची मागणी आहे.
तरुणाई आणि रोजगार हा नवा अजेंडा
शहरातील तरुणांना नोकरी आणि व्यवसायाच्या संधी कमी आहेत.
नवीन कौशल्य विकास केंद्रे, उद्योग प्रशिक्षण, आणि उद्योजकतेला चालना देणं या विषयांवरही नागरिकांनी नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांना प्रश्न विचारायला सुरुवात केली आहे. पारदर्शक आणि भ्रष्टाचारमुक्त प्रशासनाची अपेक्षा“जनतेच्या पैशाचा हिशेब जनतेलाच द्यावा” अशी भावना शहरात दृढ होत आहे.वसमतकरांना आता पारदर्शक, जबाबदार आणि लोकाभिमुख प्रशासनाची अपेक्षा आहे.
केवळ सत्तेची आकांक्षा नाही, तर सेवाभाव आणि सचोटी असलेले नेतृत्वच नागरिक स्वीकारतील. वसमतची जनता सजग आहे, आणि या वेळी मतदान हा केवळ राजकीय कार्यक्रम नाही,
तर शहराच्या भविष्यासाठीचा विचारपूर्वक निर्णय ठरणार आहे. नगराध्यक्षपद ही केवळ खुर्ची नव्हे, तर जबाबदारी आहे आणि ती जबाबदारी पेलणाऱ्यालाच जनता यावेळी “नेता” म्हणून मान्यता देणार,हा वसमतच्या नागरिकांचा ठाम निर्धार आहे.



















