बदनापूर / जालना – बदनापूर येथे आर.पी. इंग्लिश मीडियम स्कूल, बदनापूर येथे बाल दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. १४ नोव्हेंबर हा दिवस म्हणजे भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस सर्वत्र बाल दिवस म्हणून साजरा केला जातो यावर्षी शाळेतही हा दिवस साजरा करण्यात आला. या दिनानिमित्त शाळेमध्ये विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. नेहमी परिपाठ सादर करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षकांनी स्वतः परिपाठाचे आयोजन केले होते व नंतर मुख्य कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. अशा पद्धतीने मुख्याध्यापक, शिक्षक ,विद्यार्थी व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.
या विशेष कार्यक्रमप्रसंगी आर. पी .इंग्रजी शाळेचे मुख्याध्यापक श्री विजयकुमार मल्लिक सर हे अध्यक्षस्थानी होते, तसेच प्रमुख उपस्थितीमध्ये इतर विभागांचे मुख्याध्यापक श्री. एम. जी. बेग सर व श्रीमती मनीषा सूर्यवंशी मॅडम यांच्यासोबत शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते. या विशेष प्रसंगी वीरगाथा 5.0 या स्पर्धेतील प्रथम फेरीतील विजेते स्पर्धक-विद्यार्थी यांची नावे जाहीर करण्यात आली. प्रमुख पाहुणे म्हणून या विद्यार्थ्यांना आमंत्रित करण्यात आले. या विद्यार्थ्यांच्या हस्ते पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले व खराखुरा बाल दिवस साजरा करण्यात आला.
या विशेष प्रसंगी प्रसंगी या विद्यार्थ्यांचे स्वागत करून त्यांचा सन्मान करण्यात आला. शिक्षकांचे मनोगत ,कविता सादरीकरण ,गीत गायन ,विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळे खेळांचेही आयोजन करण्यात आले. याप्रसंगी संस्थेचे- संस्थापक अध्यक्ष मा. श्री. भरत लक्ष्मणराव भांदरगे सर यांनी विद्यार्थ्यांना बाल दिनाच्या शुभेच्छा देऊन वीरगाथा 5.0 या स्पर्धेतील प्रथम फेरी विजेत्या स्पर्धकांचे अभिनंदन करून द्वितीय फेरीसाठी शुभेच्छा दिल्या. संस्थेच्या वतीने विद्यार्थ्यांना मिठाईवाटप करून कार्यक्रम संपन्न झाला.



















