बार्शी – महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्यावतीने बार्शी ते कोल्हापूर या हायकोर्ट बस सेवा उद्या शनिवार दि. २२ नोव्हेंबरला सकाळी ६ वाजता बार्शी बसस्थानक येथे शुभारंभ करण्यात येणार असल्याची माहिती बार्शी आगार व्यवस्थापक श्रीमती मधुरा जाधवर- दराडे यांनी दिली.
बार्शी शहर व परिसरातील नागरिकांना कोल्हापूर येथे हायकोर्ट कामाला जाणाऱ्यासाठी मोठ्या प्रमाणात सोय झालेली आहे. त्यामुळे प्रवाशांनी आनंद व्यक्त केला आहे. सदर बस उद्यापासून सकाळी ६ वाजता व दुपारी २ वाजता या वेळेत सुरु करण्यात आली असून बार्शी बसस्थानकातून सकाळी ६ वाजता ही बस निघणार असून कुर्डूवाडी, पंढरपूर, मिरज, जयसिंगपूर, हातकणंगले मार्गे कोल्हापूरला दुपारी १२ वाजता पोहोचेल.
तसेच बार्शीला येताना कोल्हापूर ते बार्शी ही बस कोल्हापूरमधून दुपारी २ वाजता निघेल. ही बस हातकणंगले, जयसिंगपूर, मिरज, पंढरपूर, कुर्डूवाडी मार्गे बार्शीला रात्री ८ वाजता पोहोचेल. बार्शी – कोल्हापूर या नवीन हायकोर्ट बससेवेचा सर्व प्रवासी बांधवांनी लाभ घ्यावा, असे आवाहन बार्शी आगाराच्यावतीने करण्यात आले आहे.


















