देगलूर / नांदेड – देगलूर–बिलोली मतदारसंघासह संपूर्ण नांदेड जिल्ह्यात बिबट्याच्या वाढत्या वावरामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले असून ग्रामीण भागातील शेतकरी, नागरिक अक्षरशः दहशतीत दिवस काढत आहेत. याच पार्श्वभूमीवर आ. जितेश अंतापूरकर यांनी हिवाळी अधिवेशनात ‘पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन’द्वारे हा गंभीर मुद्दा उपस्थित करत शासनाचे लक्ष वेधले.
गेल्या काही आठवड्यांपासून बिबट्या तसेच अन्य हिंस्र वन्यप्राण्यांचे दर्शन नागरी वस्त्यांमध्ये होत असल्याने परिस्थिती अधिकच गंभीर बनली आहे. काही ठिकाणी दिवसा शेतावर जाणेसुद्धा शेतकऱ्यांना धोकादायक ठरत आहे. त्यात भर म्हणून महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या ढिसाळ नियोजनामुळे दिवसा लोडशेडिंग तर रात्री वीजपुरवठा सुरू असल्यानं, पिकांना पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांना मध्यरात्री शेतावर जावे लागत आहे. बिबट्या आणि वाघांच्या हालचाली वाढलेल्या काळात हा प्रवास ‘जीवावर उदार होऊन’ करावा लागत असल्याचे आ. अंतापूरकर यांनी स्पष्ट केले.
वनविभागाच्या निष्क्रीयतेमुळे बिबट्या, वाघ यांसारखे वन्यजीव सर्रास वस्तीमध्ये फिरताना दिसत असून राज्यभरात अशा घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. काही ठिकाणी पाळीव जनावरेच नव्हे तर लहान मुले आणि वयोवृद्ध नागरिकही या हिंस्र प्राण्यांच्या हल्ल्याचे बळी पडल्याच्या घटना वाढत असल्याचा त्यांनी उल्लेख केला.
या सर्व परिस्थितीची तत्काळ दखल घेऊन वनविभागाला संबंधित बिबट्यांना पकडण्याचे आदेश देण्यात यावेत, तसेच दिवसाची लोडशेडिंग तातडीने थांबवावी, अशी कडवी मागणी अंतापूरकर यांनी सभागृहात केली. नागरिक आणि शेतकरी सुरक्षित राहण्यासाठी शासनाने त्वरित उपाययोजना करणे अत्यावश्यक असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.
महावितरण विभाग व वनविभागाचे अक्षम्य दुर्लक्ष..
एकीकडे बिबट्यांचा नागरीक वस्तीत वावर मोठ्या प्रमाणात होत असताना संबधित वनविभागाचे अधिकारी अक्षम्य दुर्लक्ष करीत सुस्त असून परिणामी नागरीक भयभीत आहेत.दूसरीकडे महावितरण विभागाच्या अक्षम्य दुर्लक्ष व असंवेदनशीलतेमुळे परिणामी रब्बी हंगामात बळीराजाला राञीला शेतात पाणी द्यावे लागत असून बळीराजा जिवावर उदार होत आहे यामुळे वनविभाग बिबट्यांचा बंदोबदस्त व महावितरण कंपनीने दिवसा विज वितरण सुरळीत चालू ठेवण्याची सुचना सभागृहाच्या माध्यमातून सुचना केल्या आहेत.
















