मंगळवेढा – सोलापूर जिल्हा ग्रामीणचे पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी यांनी मंगळवेढा पोलीस स्टेशनला भेट देवून तब्बल 7 तास कसून चौकशी करीत वार्षिक तपासणी केली. दरम्यान प्रारंभी पोलीस अधिक्षकांना पोलीस खात्याच्यावतीने मानवंदना देण्यात आली.
पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी हे गूरूवार सकाळी ११ वाजता पाेलीस स्टेशनला दाखल हाेऊन सायंकाळी ६ पर्यंत यांनी पोलीस स्टेशन परिसर तसेच पोलीस स्टेशन मधील स्वच्छता व निटनेटकेपणा याची पाहणी केली. या दरम्यान पोलीस स्टेशन मधील वर्षानुवर्षे प्रलंबीत असलेल्या मुद्देमालाची येथील पोलीस अधिकार्यांनी निर्गती केल्याने याबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले. पोलीस स्टेशन मध्ये येणार तक्रारदार यांना लवकरात लवकर न्याय मिळावा यासाठी त्यांनी शासनाने नव्याने अंमलात आणलेल्या कायद्यानुसार गुन्ह्याची उकल 30,60,90 दिवसात पुर्ण करुन गुन्हे तपास पुर्ण करण्याच्या सुचना केल्या. येथील अभिलेखाची पाहणी करुन काही महत्वाच्या सुचना दिल्या. ज्या अधिकारी व कर्मचार्यांनी उत्कृष्ट काम केले आहे त्यांचे अभिनंदन करुन पुढील कामासा शुभेच्छा दिल्या तर ज्यांनी आपल्याकडील दाखल गुन्हे पेंडींग ठेवले त्यांची मात्र चांगलीच कानउघडणी केली. सर्व बीट अंमलदारांना गावामध्ये ग्रामसुरक्षा दल कार्यान्वीत करुन गुन्हे नियंत्रण करणेबाबत योग्य ते मार्गदर्शन केले. पोलीस ठाणे हद्दीतील रेकॉर्डवरील गुन्हेगारांना पोलीस स्टेशनला बोलावून त्यांना गुन्हेगारी प्रवृत्तीपासून मन परिवर्तन करण्यासाठी योग्य ते त्यांना मार्गदर्शन केले. पोलीस कर्मचारी यांची बैठक घेवून त्यांच्या अडीअडचणी समजून घेवून निराकारण केले. नव्याने सुरु करण्यात आलेल्या वारंवार होणार्या घरफोड्या,दरोडे,अपघात यावर नियंत्रण ठेवण्यासाठी क्राईम मॅपींग करुन त्यावर नियंत्रण ठेवून जनतेच्या मनामध्ये सुरक्षेची भावना निर्माण करण्यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजनेची माहिती देण्यात आली.
मंगळवेढा पोलीस स्टेशन येथे पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी वार्षिक तपासणी प्रसंगी पोलीस कर्मचार्यांच्या समवेत टिपलेले छायाचित्र.

















