नागपूर – राष्ट्रकुल संसदीय अभ्यास मंडळाच्या माध्यमातून राज्यशास्त्राचे विद्यार्थी प्रशिक्षणासाठी येत असतात. या विद्यार्थ्यांना कायदे निर्मितीची प्रक्रिया, संसदीय पद्धत अभ्यासण्याची संधी प्राप्त होते. अशा प्रशिक्षण प्रबोधनातूनच लोकशाही समृद्ध होते. त्यामुळे प्रबोधन, प्रशिक्षण व संशोधन हे समृद्ध लोकशाहीची त्रिसुत्री आहे, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केले.
विधान परिषदेने संमत केलेले महत्त्वपूर्ण विधेयके ठराव आणि धोरणे याविषयी वि. स. पागे संसदीय प्रशिक्षण केंद्रातर्फे प्रकाशित संदर्भ समृद्ध ग्रंथ मालिकेतील द्वितीय ग्रंथाचे प्रकाशनप्रसंगी ते बोलत होते. विधानपरिषद सभागृहात झालेल्या कार्यक्रमात विधान परिषद सभापती प्रा. राम शिंदे, विधानसभा अध्यक्ष ॲड राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील, उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे उपस्थित होत्या.
केंद्रीय मंत्री गडकरी म्हणाले, ज्या सभागृहाने १८ वर्ष शिकवीत अनुभवसंपन्न केले आणि देशाची सेवा करण्याची संधी दिली, अशा सभागृहात कार्यक्रमाच्या निमित्ताने पुन्हा येण्याचे भाग्य मिळाले. त्यामुळे या सभागृहातील आठवणींना उजाळा मिळाला. चर्चेद्वारे समोरच्याकडून राज्याच्या विकासासाठी हवे असलेले काढून घेण्याचे कौशल्य याच सभागृहाने दिले. विधान परिषद सभागृहात कायदा निर्मितीवर झालेल्या चर्चेतून परिणामकारक कायद्यांची निर्मिती झाली आहे. या सभागृहात राज्याच्या विविध प्रश्नांवर चर्चा करताना नियमांची लढाई झाली तरी कधी वैयक्तिक संबंधांमध्ये कटूता आली नाही, हीच आपल्या लोकशाहीची समृद्ध परंपरा आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले,’ कायदा निर्मिती प्रक्रियेत सभागृहांमध्ये होत असलेली चर्चा अत्यंत महत्त्वाची असते. अशा चर्चांमधूनच प्रगल्भ कायद्याची निर्मिती होते. चर्चांमधून निर्मित झालेल्या कायद्यांमध्ये जनमानसाचे प्रतिबिंब दिसून येते. अशा कायद्यांचा निश्चितच लोककल्याणासाठी उपयोग होत असल्याचे सांगून ते म्हणाले, ‘ डॉ. बाबासाहेब आंबेडकर विधान परिषद सभागृहाचे सदस्य होते. या सभागृहाने अतिशय हुशार, अनुभवी सदस्य दिले आहेत. त्यांच्या हुशारी, अनुभवाचा लाभ कायदा निर्मिती प्रक्रियेत झाला आहे. या सभागृहाने पारित केलेले कायदे, ध्येयधोरणे यावर आधारित ग्रंथसंपदा निर्माण होत आहे. आपल्या सभागृहातील कामकाजाचे ‘ रेकॉर्ड ‘ होणे अत्यंत महत्त्वाचे आहे. रेकॉर्ड नसल्याने अनेक ऐतिहासिक संदर्भाना आपण मुकलो आहोत.
पश्चिमात्य देशांमध्ये ‘ रेकॉर्ड’ असल्यामुळे त्यांचे संदर्भ आपणास घ्यावे लागतात. आपली लोकशाही पद्धत त्यांच्यापेक्षा दोन हजार वर्षांनी जुनी आहे, मात्र रेकॉर्ड नसल्याने संदर्भ उपलब्ध होत नाहीत. इतिहास हा संकलित करावयाचा असतो. त्यामुळे सभागृहातील भाषणे, निर्मित कायदे यांचे संकलन करून प्रकाशित केलेला ग्रंथ हा नेहमी ऐतिहासिक दस्ताऐवज ठरेल, असा विश्वासही मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला.
राज्याच्या मागास भागाचा विकास करण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी 1950 नंतर पहिल्यांदा संविधानात उपलब्ध कलमांचा उपयोग केला. त्यामुळे विकासाचा अनुशेष दूर करण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न झाले, अशा शब्दात त्यांनी गडकरी यांच्या कार्याचा गौरवही केला.
सभापती प्रा. राम शिंदे,’ देशामध्ये द्विसभागृह पद्धत अत्यंत महत्त्वाची आहे. प्रभावी कायदे निर्मिती यामुळे शक्य झाली आहे. राज्याच्या विविध प्रश्नांवर चर्चा घडवून आणल्यानंतर निर्मित होणारे कायदे तसेच ध्येयधोरणे राज्याच्या विकासासाठी पोषक ठरतात. ‘प्रास्ताविक उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी केले. ग्रंथाच्या संपादन कामामध्ये पत्रकार योगेश त्रिवेदी, विलास मुकादम व किशोर आपटे यांनी सहभाग दिल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.
















