बार्शी – टेनिस बॉल क्रिकेटच्या विश्वात बार्शीचे नाव उज्वल करणाऱ्या वेगवान गोलंदाज तुकाराम कुंचे यांची इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग (ISPL)च्या तिसऱ्या हंगामासाठी अहमदाबाद लॉयन्स संघाच्या सहाय्यक प्रशिक्षकपदी निवड झाली आहे. ही निवड बार्शीकरांसाठी अभिमानास्पद ठरली असून यामुळे बार्शीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला आहे.
बार्शीतील सुभाषनगर परिसरातील साध्या कुटुंबातून उदयास आलेले तुकाराम कुंचे यांनी आपल्या सुसाट वेगाने आणि अचूक यॉर्करने फलंदाजांना नेहमीच हैराण केले आहे. त्यांनी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आपल्या खेळाची छाप पाडली. पुणे आणि मुंबईसारख्या क्रिकेट केंद्रांमध्ये दिग्गजांनी त्यांच्या खेळाची दखल घेऊन त्यांना संघात स्थान दिले.
तुकाराम कुंचे यांचा बार्शीतून सुरु झालेला प्रवास थेट भारतीय टेनिस क्रिकेट संघापर्यंत पोहोचला आहे. ते महाराष्ट्रातील अनेक नामांकित संघांचे ‘आयकॉन प्लेयर’ राहिले असून, मैदानावर अधिराज्य गाजवले. आजही ते बार्शी कॉलेजच्या मैदानावर नित्यनियमाने सराव करतात. तसेच युवा खेळाडूंना मार्गदर्शन करतात.
प्रतिकूल परिस्थितीत जिद्द आणि चिकाटीच्या बळावर यश मिळवलेल्या तुकाराम कुंचे यांचा खेळाडूपासून प्रशिक्षक होण्याचा प्रवास अनेक तरुण खेळाडूंसाठी प्रेरणादायी आहे. आता त्यांच्या प्रदीर्घ अनुभवाचा लाभ अहमदाबाद लॉयन्सच्या युवा खेळाडूंना मिळणार आहे.
ISPLच्या तिसऱ्या हंगामात अजय देवगण मालकीच्या अहमदाबाद लॉयन्ससह नव्या संघांचा समावेश झाला असून, स्पर्धा आणखी रोमांचक होणार आहे. तुकाराम कुंचे यांच्या या नव्या इनिंगसाठी बार्शीकरांसह सर्व क्रिकेटरसिक शुभेच्छा देत आहेत.

















