लवंग – माळशिरस तालुक्यातील लवंग येथे रत्नाई कृषी महाविद्यालय, अकलूज येथील कृषी कन्यांनी शेतकरी महिलांना पपईपासून मूल्यवर्धित पदार्थ तयार करण्याचे प्रात्यक्षिक करून दाखवले.
महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी संलग्नित रत्नाई कृषी महाविद्यालयाच्या ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत मंगळवारी कृषी कन्यांनी लवंग गावास भेट दिली. यावेळी त्यांनी महिलांना पपईपासून ‘टुटी-फ्रुटी’ तयार करण्याची संपूर्ण प्रक्रिया प्रत्यक्ष दाखवून दिली.
मूल्यवर्धन म्हणजे कच्च्या शेतमालाचे स्वरूप बदलून उच्च गुणवत्तेचे अंतिम उत्पादन तयार करणे होय. त्यामुळे उत्पादनाचे पोषणमूल्य वाढते तसेच काढणीनंतर होणारे नुकसान कमी करण्यास मदत होते, असे मार्गदर्शन कृषी कन्यांनी यावेळी केले.
या प्रात्यक्षिकात कृषी कन्या प्राजक्ता जाधव, गौरी होले, प्रेरणा पवार, ऋतुजा पवार, वैष्णवी शेळके, वैष्णवी खाडे, साक्षी डोंबाळे व सीमा सतपुते यांनी सहभाग घेतला.
कार्यक्रमासाठी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष संग्रामसिंह मोहिते-पाटील, प्राचार्य आर. जी. नलावडे, कार्यक्रम समन्वयक एस. एम. एकतपूरे, कार्यक्रम अधिकारी प्रा. एम. एम. चंदनकर व प्रा. एच. व्ही. खराडे यांचे मार्गदर्शन लाभले. यावेळी लवंग गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

















