मोहोळ – सोलापूर जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेच्या अशासकीय सदस्यपदी एकूण १९ जणांची निवड जिल्हाधिकारी सोलापूर यांनी केली असून, या निवडीत मोहोळ येथील सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय वसंतराव कुलकर्णी आणि राजन तानाजी घाडगे यांचा समावेश झाल्याने त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
मोहोळ शहरात ग्राहकांचे हक्क व अधिकार यासाठी अहोरात्र कार्य करणारे, जनहितासाठी सातत्याने झटणारे कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांच्या या सामाजिक योगदानाची दखल घेत शासनाच्या वतीने ही निवड करण्यात आली आहे. सोलापूर जिल्हा ग्राहक पंचायतीच्या वतीने त्यांच्या नावांची शिफारस करण्यात आली होती.
या निवडीबद्दल पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष दिलीप देशपांडे, विद्यमान अध्यक्ष महेश सोवनी, तसेच ग्राहक पंचायतीचे जिल्हाध्यक्ष शशिकांत हरिदास यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. विविध सामाजिक, शैक्षणिक व पत्रकार क्षेत्रातूनही त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत असून, मोहोळ शहरात त्यांच्या निवडीबद्दल आनंदाचे वातावरण आहे.
ग्राहक चळवळीतून जनजागृती व न्याय मिळवून देण्याचे कार्य अधिक जोमाने होईल, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

















