सोलापूर – भारतीय जनता पार्टीचे परिवहन समितीचे माजी चेअरमन तसेच गेल्या ३० वर्षांपासून भाजपमध्ये कार्यरत असलेले बाळे भागातील जेष्ठ नेते सोमनाथ तोडकरी यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात आपल्या परिवारासह व असंख्य कार्यकर्त्यां समवेत प्रवेश केला.
१९९६ पासून बाळे परिसरात भाजपची पायाभरणी करणारे, पहिले भाजप पक्षाचा बोर्ड लावणारे आणि पक्षाची रोपटे रुजवणारे म्हणून ओळख असलेले सोमनाथ तोडकरी यांच्या प्रवेशामुळे बाळे भागातील राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. या प्रवेशानंतर परिसरात उलटसुलट चर्चाना उधाण आले असून भाजपमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे.
तोडकरी कुटुंबाकडून त्यांच्या वहिनी अनुजा गणेश तोडकरी यांची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून उमेदवारीची मागणी करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर हा प्रवेश अधिक महत्त्वाचा मानला जात असून भाजपला बाळे भागात चांगलेच खिंडार पडल्याचे बोलले जात आहे.
हा पक्षप्रवेश सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी शिवसेनेच्या उपनेत्या अस्मिता गायकवाड, लोकसभा क्षेत्र प्रमुख पुरुषोत्तम बरडे, जिल्हाप्रमुख संतोष पाटील, उपजिल्हा प्रमुख दत्ता पंत वानकर, शहरप्रमुख महेश धाराशिवकर, संतोष केंगणाळकर, शहर संघटक सुरेश जगताप, महिला आघाडी संघटक स्वाती रुपनर, विभागप्रमुख आबा सावंत, अण्णा गवळी, महेश गवळी, शाखाप्रमुख मारुती खानापुरे, संजय काळे, गणेश तोडकरी, उपशहर प्रमुख दीपक दळवी, लालू राठोड, शाखाप्रमुख अक्षय लोंढे यांच्यासह अनेक शिवसैनिक व पदाधिकारी उपस्थित होते.

















