देगलूर : देगलूर तालुक्यातील सुजायतपूर येथील अंगणवाडी सेविका, कवयित्री, गीतकार व साहित्यिक सावित्रीताई आडकुते शेवाळकर यांना भारतीय दलित साहित्य अकादमी, दिल्ली यांच्या वतीने देण्यात येणाऱ्या सावित्रीबाई फुले राष्ट्रीय फेलोशिप पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
दिल्ली येथील पंचशील आश्रम, झेंडेवालान रिंग रोड येथे आयोजित ४१ व्या भारतीय दलित साहित्य संमेलनात, देशातील २२ राज्यांतील साहित्यिक, पत्रकार व सामाजिक कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. अकादमीचे प्रमुख संघप्रिय गौतम, अध्यक्ष सुमनाक्षर यांच्या हस्ते सावित्रीताई यांना फेलोशिप प्रदान करण्यात आली. सावित्रीताई आडकुते शेवाळकर या मागील अनेक वर्षांपासून कविता, गीत, लघुकथा व लेखन करत असून त्यांची प्रितसागर, फुलबाग, शिक्षणाचा झुला, अनामिक प्रित फुले ही साहित्यकृती प्रकाशित झालेली आहेत. त्यांच्या साहित्यिक व सामाजिक कार्याची दखल घेऊन यापूर्वीही त्यांना विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.
नांदेड जिल्ह्यात दलित चळवळीचे लेखन, महापुरुषांचे विचार तळागाळापर्यंत पोहोचवणे, उत्कृष्ट महिलांचा सन्मान, गुणवंत विद्यार्थ्यांचे सत्कार, शैक्षणिक साहित्य वाटप, बौद्ध धर्म परिषद, महिलांसाठी मार्गदर्शन शिबिरे, आरोग्य शिबिरे तसेच किशोरवयीन मुलांसाठी मार्गदर्शन कार्यक्रम असे अनेक सामाजिक उपक्रम त्यांनी राबविले आहेत. साहित्य लेखनाच्या माध्यमातून सामाजिक जाणिवा निर्माण करण्यासाठी त्यांचे योगदान उल्लेखनीय आहे. एक उत्कृष्ट अंगणवाडी सेविका म्हणून त्या कार्यरत असून जेतवन सामाजिक शैक्षणिक चॅरिटेबल ट्रस्ट, सुजायतपूर या संस्थेच्या माध्यमातूनही त्या सामाजिक कार्य करीत आहेत.
सावित्रीताई आडकुते शेवाळकर यांच्या या बहुआयामी कार्याची दखल घेत भारतीय दलित साहित्य अकादमी, दिल्ली यांच्या वतीने सावित्रीबाई फुले राष्ट्रीय फेलोशिप प्रदान करून त्यांचा गौरव करण्यात आला. या पुरस्कार वितरण सोहळ्यास संघप्रिय गौतम, अध्यक्ष सुमनाक्षर, सचिव जय सुमनाक्षर, केंद्रीय मंत्री बबनराव घोलप, राज्यमंत्री यमनकुमार बावरा, पंजाबचे जिल्हाधिकारी अभिषेक मुन आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.

















