पंढरपूर – सोलापूर जिल्ह्यात यंदा निर्माण झालेल्या भीषण दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाकडून शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. पंढरपूर आणि मंगळवेढा तालुक्यातील सुमारे १ लाख ६६ हजार शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाले असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेली पाच हजार रुपयांची अग्रीम मदत शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यासाठी याद्या अपलोड करण्याचे काम सुरू आहे. येत्या दोन दिवसांत, दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात ही मदत जमा होईल, अशी माहिती आमदार समाधान आवताडे यांनी दिली.
दुष्काळी परिस्थिती आणि आरोग्य विभागाच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी पंढरपूर येथील विश्रामगृहात आमदार समाधान आवताडे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीस पंचायत समितीचे सभापती शुभम वाघमारे, उपसभापती, जिल्हा परिषद व पंचायत समितीचे सदस्य तसेच विविध शासकीय विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
दरम्यान शासनाकडून सोलापूर जिल्ह्यातील अकराही तालुके दुष्काळग्रस्त जाहीर करण्यात आले आहेत. शासनाने जाहीर केलेल्या मदतीनुसार पाच हजार रुपयांची अग्रीम रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील सुमारे एक लाख ६६ हजार शेतकऱ्यांच्या खात्यांसाठी आवश्यक याद्या अपलोड करण्याचे काम सुरू आहे. येत्या दोन दिवसांत ही रक्कम जमा होण्याची अपेक्षा आहे असेही आमदार आवताडे यांनी सांगितले. त्यामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना दिवाळीच्या तोंडावर मोठा दिलासा मिळणार आहे.
————————-
चौकट : ( दोन दिवसांमध्ये सीटीस्कँन मशिन होईल दूरुस्त )
दरम्यान, याच बैठकीत पंढरपूर येथील सामान्य रुग्णालयातील आरोग्य सुविधांचाही आढावा घेण्यात आला. रुग्णालयातील सीटीस्कॅन मशीन बंद असल्याचा प्रश्न उपस्थित करण्यात आला. यावर वैद्यकीय अधिकारी विजयकुमार सरडे यांनी येत्या दोन दिवसांत सीटीस्कॅन मशीन दुरुस्त करण्यात येईल, अशी माहिती दिली. त्यामुळे रुग्णांना सीटीस्कॅन तपासणीसाठी बाहेर जाण्याची वेळ येऊ नये आणि सामान्य रुग्णालयातील आरोग्यसेवा अधिक सक्षम व्हावी, यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचनाही आमदार आवताडे यांच्याकडून देण्यात आल्या.
Post Views: 20