अक्कलकोट – १ जानेवारी सन २०२६ नुतन वर्षाच्या पावन पर्वावर श्री स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी भक्तांनी मोठ्या श्रद्धेने गर्दी केली होती. श्री स्वामी समर्थांच्या व श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान मधील ऐतिहासिक प्रत्यक्ष व स्वामी समर्थांचे देहरूपी सहवास लाभलेल्या वटवृक्षाच्या दर्शनासाठी भाविकांनी केलेली गर्दी व लागलेल्या रांगा या विक्रमी भाविकांच्या उपस्थितीचे साक्ष देत होत्या. दर्शन रांग थेट फत्तेसिंह चौक, भारत गल्ली, देशमुख गल्ली मार्गे डबरे गल्ली पर्यंत लांबली होती. सर्व स्वामी भक्तांचे स्वामी दर्शन सुलभ व जलद पद्धतीने व्हावे याकरिता मंदिर समितीचे चेअरमन महेश इंगळे यांनी स्वतः पहाटे ४ पासूनच दिवसभर व रात्री ११ पर्यंत मंदिरात उपस्थित राहून
दर्शनाचे विविध नियोजन करताना निदर्शनास येत होते. भाविकांना टप्प्याटप्प्याने दर्शनास सोडण्यासोबतच वयोवृद्ध व विकलांग भाविकांना व्हील चेअरच्या मार्फत स्वामी दर्शनाची सेवाभावी दर्शन प्रणाली राबविण्यात आली. हे दृश्य पाहून महेश इंगळे कुटूंबियांची स्वामी भक्तीची ताकद अनुभवायला मिळाली. याप्रसंगी बोलताना मंदिर समितीचे चेअरमन व नगरसेवक महेश इंगळे यांनी हजारो भक्तांनी मनोभावे, संयमाने व श्रद्धेने स्वामींचे दर्शन घेतले. “स्वामींच्या दर्शनाने मनोकामना पूर्ण होतात” या अढळ विश्वासाने भक्तांच्या चेहऱ्यावर समाधान व आशेचे भाव स्पष्ट दिसत होते.
श्री स्वामी समर्थ आपल्या भक्तांना कधीही रिकाम्या हाताने पाठवत नाहीत, अशी भक्तांची भावना आहे. नववर्षाच्या आरंभी स्वामींच्या चरणी मस्तक ठेवून दर्शन घेतल्याने जीवनात सुख, शांती, आरोग्य व यश प्राप्त होते असा भक्तांचा दृढ विश्वास आहे. सर्व स्वामी भक्तांनी श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतल्यानंतर सर्व भाविकांचे मनोकामना श्री स्वामी समर्थ नक्कीच पूर्ण करतील असा विश्वास महेश इंगळे यांनी व्यक्त करत सर्व भाविकांना या नूतन वर्षात सुख, समृद्धी, ऐश्वर्य लाभो असे सांगून सर्व भाविकांना नूतन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. असा हा स्वामी कृपेचा अनुभव, जो प्रत्येक भक्ताच्या मनात आनंद व श्रद्धा अधिक दृढ करणारा ठरला. यावेळी मोहनराव पुजारी, मंदार महाराज पुजारी, व्यंकटेश पुजारी, प्रथमेश इंगळे, मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, श्रीशैल गवंडी, गिरीश पवार, विपुल जाधव, श्रीकांत मलवे, अमर पाटील, श्रीकांत मलवे,
सागर गोंडाळ, दर्शन घाटगे, आदित्य गवंडी, तन्मय इचगे आदींसह मंदिर समितीचे सर्व सेवेकरी, कर्मचारी यांनी भाविकांचे दर्शन सुलभ होणे कामी परिश्रम घेतले.
























