सोलापूर/बार्शी – बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांच्या बार्शी तालुक्यातील येडेश्वरी साखर कारखान्याने पहिली उचल तीन हजार ऐवजी 2800 रुपये अशी कमी दिल्यामुळे सर्व शेतकरी संघटनांच्या वतीने आज या साखर कारखान्यावरती आंदोलन करण्यात आले, त्यावेळी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष शंकर गायकवाड म्हणाले की, अनेक आंदोलने केल्यानंतर या साखर कारखान्याने पहिली उचल आज तीन हजार रुपये जाहीर केली असली तरी कारखाना विकत घेतला त्यावेळी मात्र शेतकऱ्यांची बिले एफ.आर.पी. अधिक व्याज अशी न दिल्यामुळे आम्ही वारंवार शांतताच्या मार्गाने निवेदने दिली.
अनेक आंदोलने केली परंतु तीन वर्षे होत आले तरी, अनेक तालुक्यातील कोट्यावधी रुपये या कारखान्याने अद्याप पर्यंत दिलेले नाही ते तात्काळ द्यावे व अंतिम ऊस दरही जाहीर करावा, अन्यथा शेतकरी उसाने मारतील असा खणखणीत इशाराही यावेळी गायकवाड यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिला त्यावेळी संभाजी ब्रिगेडचे आनंद काशीद, शेतकरी संघटनेचे हनुमंत भोसले, स्वाभिमानीचे तालुकाध्यक्ष शरद भालेकर, शकापचे रविकिरण कानगुडे, रयत क्रांतीचे कृष्णा काशीद, जनहित संघटनेचे राज्य प्रवक्ते रामराव काटे, रवींद्र मुठा, समाधान भालेकर, मुसा मुलानी, पप्पू आगलावे, पोपट आगलावे, विक्रम घायतीडक, विकास बारबोले, सदानंद आगलावे आदींसह बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते.
या आंदोलनाचा चोख पोलीस बंदोबस्त पांगरी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक श्री यावलकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी ठेवला होता.
आंदोलन स्थळी शेतकरी संघटनेचे राज्याध्यक्ष शंकर गायकवाड, इतर नेते आणि शेतकरी दिसत आहेत.

























