सोलापूर – लिटिल चॅम्प 12 वर्षांखालील क्रिकेट स्पर्धेत डॉ. देशपांडे संघाने हेमंत हबीब संघाचा ७ गडी राखून पराभव करत शानदार विजय मिळवला. विराज टकले याने केलेल्या उत्कृष्ट अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर देशपांडे संघाने हा सामना एकतर्फी जिंकला.
जुळे सोलापूर येथील भंडारी मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत बुधवारी झालेल्या सामन्यात हेमंत हबीब संघाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, डॉ. देशपांडे संघाच्या अचूक गोलंदाजीसमोर त्यांचा डाव पत्त्यासारखा कोसळला. हेमंत हबीब संघाला २७.५ षटकांत सर्वबाद अवघ्या ९१ धावांपर्यंतच मजल मारता आली.
प्रत्युत्तरादाखल ९२ धावांच्या माफक लक्ष्याचा पाठलाग करताना डॉ. देशपांडे संघाने सुरुवातीपासूनच उत्कृष्ट फलंदाजीचे प्रदर्शन केले. त्यांनी १५.२ षटकांत ३ गड्यांच्या मोबदल्यात ९२ धावा करत ७ गडी राखून विजय मिळवला.
डॉक्टर देशपांडे संघाच्या विजयात एनजीसीए अकॅडमीच्या विराज टाकले याने महत्त्वाची भूमिका बजावली. त्याने ४ षटकांत अवघ्या १३ धावा देत ३ महत्त्वपूर्ण बळी घेतले आणि त्यानंतर फलंदाजीतही १४ चेंडूंत नाबाद १७ धावांची संयमी खेळी केली. त्याच्या या दमदार कामगिरीमुळे त्याला ‘सामनावीर’ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.






















