सोलापूर : पावसाळ्यात शहर स्वच्छ व आरोग्यदायी ठेवण्याच्या उद्देशाने सोलापूर महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागातर्फे राबविण्यात येणाऱ्या नऊ दिवसीय विशेष स्वच्छता मोहिमेचा बुधवारी महापौर विनायक कोंड्याल यांच्या हस्ते छत्रपती संभाजी महाराज चौक येथे शुभारंभ करण्यात आला. अभियानास प्रारंभ करण्यापूर्वी उपस्थित अधिकारी, कर्मचारी व सफाई कर्मचाऱ्यांनी स्वच्छतेची शपथ घेतली. बुधवारी पहिल्या दिवशी १० टन कचरा आणि ११ ब्रास आजोरा उचलण्यात आला.
महापालिकेतर्फे १ ते ९ जुलैदरम्यान शहरातील प्रत्येक झोनमधील निवडक भागांमध्ये एकूण ७२ ठिकाणी विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेत मुख्य रस्ते, चौक, सार्वजनिक ठिकाणे, नाले, गटारी आणि विविध वस्त्यांची व्यापक स्वच्छता केली जाणार आहे. साचलेला गाळ व माती काढणे, झुडपे व गवत हटविणे, कचरा उचलणे, रस्त्यांची स्वच्छता तसेच डास प्रतिबंधक उपाययोजनांवर विशेष भर दिला जाणार आहे.
यावेळी महापौर विनायक कोंड्याल यांनी नागरिकांना स्वच्छता मोहिमेत सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले. “स्वच्छ, सुंदर आणि निरोगी सोलापूर घडविण्यासाठी नागरिकांनी कचरा उघड्यावर न टाकता घंटागाडीतच द्यावा. नागरिकांच्या सहकार्याशिवाय स्वच्छतेचे उद्दिष्ट पूर्ण होऊ शकत नाही,” असे त्यांनी सांगितले.
या प्रसंगी उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, सभागृह नेते नरेंद्र काळे, नगरसेवक बिज्जू प्रधाने, नगरसेविका मंदाकिनी तोडकरी, नगरसेवक समाधान आवळे, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे सहाय्यक आयुक्त तथा नियंत्रण अधिकारी शशिकांत भोसले, मुख्य सफाई अधीक्षक अनिल चराटे, सफाई अधीक्षक सूर्यकांत लोखंडे, सफाई अधीक्षक (वाहन) वासुदेव नडीमेटला, झोन क्रमांक १ चे मुख्य आरोग्य निरीक्षक बच्चू यांच्यासह महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी व सफाई कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या मोहिमेत नागरिक, विद्यार्थी, बचत गटांच्या महिला तसेच विविध सामाजिक व सेवाभावी संस्थांनी सहभागी होऊन परिसर स्वच्छतेसाठी सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेतर्फे करण्यात आले आहे.
मोहिमेसाठी अशी आहे यंत्रणा
बुधवारी पहिल्याच दिवशी या मोहिमेत सोलापूर शहरातील महापालिकेच्या आठ झोन अंतर्गत एकूण दहा टन कचरा आणि ११ ब्रास दगड, माती आजोरा उचलण्यात आला. या मोहिमेसाठी आठ झोन अंतर्गत एकूण 222 सेवकांनी परिश्रम घेतले. यासाठी चार जेसीबी, चार डंपर आणि 11 घंटागाड्या अशी यंत्रणा कार्यरत होती, अशी माहिती महापालिका नियंत्रण अधिकारी तथा सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले यांनी दिली.
महापौर, उपमहापौरांसह नगरसेवकांचा
स्वच्छता मोहिमेत सक्रिय सहभाग
महापौर विनायक कोंड्याल ,उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, सभागृह नेते नरेंद्र काळे, नगरसेवक बिज्जू प्रधाने, नगरसेविका मंदाकिनी तोडकरी, नगरसेवक समाधान आवळे, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे सहाय्यक आयुक्त तथा नियंत्रण अधिकारी शशिकांत भोसले यांच्यासह अधिकाऱ्यांनी हाती झाडू घेऊन या स्वच्छता मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदविला. स्वच्छतेचा कृतीशील संदेश दिला.
Post Views: 28