
सोलापूर – वालचंद कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्स कनिष्ठ महाविद्यालयातील इयत्ता 11वी’ विज्ञान’ व ‘कला’ शाखेतील विद्यार्थ्यांच्या नवीन शैक्षणिक वर्ष 2026- 27 चा महाविद्यालयीन प्रवेशोत्सव आज बुधवार दिनांक 1 जुलै रोजी, सकाळी 11 वाजता, महाविद्यालयाच्या प्रांगणात मान्यवरांच्या, प्रवेशित विद्यार्थी पालक, शिक्षक यांच्या उपस्थितीत अत्यंत उत्साहात व जल्लोषात संपन्न झाला. याप्रसंगी, प्राचार्य डॉ. संतोष कोटी, मुख्य अतिथी म्हणून उपस्थित असलेल्या शिक्षणाधिकारी योजना विभाग सौ सुलभा वठारे मॅडम, जेलरोड पोलीस स्टेशनच्या एपीआय सौ. ज्योत्स्ना भांबिस्टे मॅडम, सय्यद मॅडम, वरिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. मनोहर जोशी,डॉ. राजशेखर हिप्परगी, बायोटेक विभागाचे डॉ. राव,कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य अनुप म्हेत्रे,पर्यवेक्षक डॉ. जीवराज कस्तुरे, उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत उपप्राचार्य अनुप म्हेत्रे यांनी केले. त्यांनी अकरावीला प्रवेशित सर्व विद्यार्थ्यांचे त्यांच्या पालकांचे महाविद्यालयाच्या वतीने हार्दिक स्वागत करून, महाविद्यालयात संपन्न होणाऱ्या, इयत्ता बारावीचा निकाल, मंथली टेस्ट, महाविद्यालयीन शिस्त, व विद्यार्थ्यांची सुरक्षा, गुणवत्ताधारक शिक्षक, वर्षभर संपन्न होणार्या विविध स्पर्धा, उपक्रमांची माहिती देऊन त्याचा लाभ घेण्याचे आवाहन उपस्थित विद्यार्थ्यांना केले.
मुख्य अतिथी म्हणून लाभलेल्या शिक्षणाधिकारी सौ. सुलभा वठारे यांनी, वालचंद महाविद्यालयाच्या गुणवत्तेचे,शिस्तीचे, कार्यालयीन विभागाकडून मिळणाऱ्या सहकार्याचे, प्राचार्य व उपप्राचार्यांचे अभिनंदन करून, ” दिवस तुझे हे फुलायचे “- या भावपूर्ण गीतांच्या ओळींचा दाखला देऊन, महाविद्यालयात अकरावी प्रवेशित विद्यार्थ्यांनी व्यक्तिमत्त्वाच्या विविध विविध अंगाने फुलायचे, वयाच्या बेभानपणाला नियंत्रित करून, भान ठेवून, उज्वल भविष्याकडे वाटचाल करा, असे आवाहन त्यांनी केले. एपीआय ज्योत्स्ना भांबिस्टे यांनी, प्रवेशित विद्यार्थ्यांना शुभेच्छा व सदिच्छा देऊन, हिऱ्याला पैलू पाडताना हिऱ्याला त्रास सहन करावा लागतो, तसे पुढील दोन वर्षे जर तुम्ही,सातत्यपूर्ण अभ्यास केला, तर तुम्ही देखील तुमची स्वप्ने पूर्ण करू शकाल. काही जीवनात अडचणी आल्या तर महाविद्यालय आणि मी देखील तुमच्या पाठीशी आहे. भविष्यकाळात समुपदेशक म्हणून मी, तुम्हाला निश्चित मार्गदर्शन करण्यासाठी येईन, असे आश्वासन उपस्थित विद्यार्थ्यांना दिल. उपप्राचार्य डॉ. मनोहर जोशी यांनी, वालचंद महाविद्यालयातील माजी विद्यार्थी, देशात व परदेशात उच्च पदावर कार्यरत असून, त्यांनी आपल्या महाविद्यालयाचे नाव उज्वल केले आहे. कृषी दिनाच्या शुभेच्छा देऊन, इथे असणाऱ्या गुणवत्ताधारक शिक्षकांकडून मिळणाऱ्या उत्तम संस्काराचे बीज घेऊन आपल्या जीवनाची यशस्वी वाटचाल करा अशा सदिच्छा व शुभेच्छा त्यांनी याप्रसंगी दिल्या.
याप्रसंगी, अकरावी प्रवेशित झालेल्या ‘कला’ व ‘विज्ञान’ शाखेतील गुणानुक्रमे प्रथम तीन क्रमांक प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला. तसेच, विद्यार्थिनींना महाराष्ट्र शासनाच्या, ” पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर मोफत एसटी पास योजना” उपक्रमांतर्गत 28 विद्यार्थिनींना, मोफत पास वाटप उपस्थित मान्यवर व योजना समन्वयक शैलेंद्र विठ्ठलदास यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी, उपस्थित मान्यवरांनी, अभिनव अशा सेल्फी पॉईंटचे _ “आय लव वालचंद एज्युकेशन ग्रुप “याचे फीत कापून तसेच, स्वतः सेल्फी काढून उद्घाटन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चेतन तुपकर व प्रशांत पाटील यांनी केले. कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यासाठी, शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख राहुल हजारे, तसेच कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी बंधू-भगिनीचे सहकार्य लाभले.