सोलापूर – वालचंद कला व शास्त्र महाविद्यालयातील वरिष्ठ लिपिक भगवान दत्ता खुरगांवकर हे नियत वयोमानानुसार ३० जून रोजी सेवानिवृत्त झाले. त्यानिमित्त महाविद्यालयात आयोजित सदिच्छा समारंभात प्राचार्य डॉ. संतोष कोटी यांच्या हस्ते त्यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. या प्रसंगी उपप्राचार्य एम. पी. जोशी, आर. व्ही. हिप्परगी आणि अनुप मेहत्रे उपस्थित होते.
श्री. खुरगांवकर यांनी महाविद्यालयात ग्रंथालय परिचर पदापासून सुरुवात करून वरिष्ठ लिपिक पदापर्यंत ३५ वर्षे दीर्घ सेवा बजावली. या काळात त्यांनी महाविद्यालयाच्या कामासोबतच पतसंस्थेचे कामही सांभाळले. विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचे काम त्यांनी नेहमीच चोखपणे पार पाडले. वेळेची पर्वा न करता सकाळी लवकर येऊन ते उशिरापर्यंत सेवा देत असत. त्यांच्या याच उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना ‘भाऊसाहेब गांधी सेवाभावी पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले होते.
खुरगांवकर यांच्या विनम्र, अजातशत्रू आणि मनमिळावू स्वभावाचा, तसेच शेवटच्या दिवसापर्यंत त्यांनी जपलेल्या सकारात्मकतेचा आणि एकनिष्ठतेचा गौरव यावेळी मान्यवरांनी केला. या समारंभात प्राचार्य डॉ. संतोष कोटी यांच्यासह प्रा. डॉ. मनोहर जोशी, सिद्राम सलवदे, एस. पी. गायकवाड, विजया महाजन, आनंद महाजन, अनुप मेहत्रे, चेतन तुपकर तसेच शिक्षकेतर कर्मचारी अब्रार सय्यद, मनोज मुळकुटकर, अमोल सुपाते आणि श्रीरंग गानबोटे यांनी मनोगत व्यक्त करून खुरगांवकर यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. प्रा. पद्मावती पाटील यांनी सूत्रसंचालन केले.
——-




















