पुणे : अनाथांची आई म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पद्मश्री डॉ. सौ. सिंधूताई (माई) सपकाळ यांच्या चौथ्या पुण्यस्मरण दिनानिमित्त पुणे येथील बालगंधर्व रंगमंदिर येथे “यशोदा माई राष्ट्रीय पुरस्कार” सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी दैनिक सोलापूर तरुण भारततर्फे माईंच्या कार्याला आदरांजली म्हणून प्रकाशित करण्यात आलेल्या ‘आठवण माईंची’ या विशेष पुरवणीचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.
या प्रकाशन सोहळ्यास पद्मश्री गिरीश प्रभुणे, रेणुताई गावस्कर (अध्यक्षा – एकलव्य बाल शिक्षण व आरोग्य न्यास, ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग), सेवा संकल्प प्रतिष्ठान (चिखली, जि. बुलढाणा), विलू पूनावाला फाऊंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी जसविंदर नारंग,अनंत चिंचोळकर, ममता सिंधूताई सपकाळ, दीपक दादा गायकवाड, विनय सिंधूताई सपकाळ, प्रणव सातभाई, सागर बोधगिरे तसेच दैनिक तरुण भारतचे धाराशिव जिल्हा प्रतिनिधी अनिल आगलावे आदी मान्यवर उपस्थित होते.
‘आठवण माईंची’ या विशेष पुरवणीमधून सिंधूताई सपकाळ यांच्या संघर्षमय जीवनप्रवासाचा, अनाथ, निराधार आणि वंचित मुलांसाठी केलेल्या कार्याचा तसेच समाजाला दिलेल्या मोलाच्या संदेशांचा सविस्तर आढावा घेण्यात आला आहे. माईंच्या कार्यातून प्रेरणा घेऊन समाजात सेवाभाव आणि माणुसकी जपण्याचा संदेश ही पुरवणी देते.
कार्यक्रमादरम्यान मान्यवरांनी सिंधूताई सपकाळ यांच्या सामाजिक कार्यावर प्रकाश टाकत त्यांच्या विचारांची आणि कार्याची आजच्या पिढीला अत्यंत गरज असल्याचे मत व्यक्त केले. पुरस्कार सोहळ्याच्या माध्यमातून सामाजिक, शैक्षणिक व सेवाभावी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांचा सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमास विविध सामाजिक संस्था, सेवाभावी कार्यकर्ते, पत्रकार तसेच माईंच्या कार्याने प्रेरित असलेले नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण सोहळा भावनिक आणि प्रेरणादायी वातावरणात पार पडला.

























