अक्कलकोट : स्वामी विवेकानंद हे आधुनिक भारताच्या वैचारिक पुनर्जागरणाचे महान शिल्पकार होते, त्यांनी भारतीय तत्त्वज्ञान, वेदांत आणि अध्यात्माला जागतिक मान्यता मिळवून दिली, त्यामुळे हिंदू धर्म, तत्त्वज्ञान विकासास चालना मिळाली, म्हणून त्यांच्या कार्याचे सतत स्मरण व्हावे या उद्देशाने पंचप्पा कल्याणशेट्टी यांनी महर्षी विवेकानंद समाजकल्याण संस्थेची स्थापना केली असे प्रतिपादन मल्लिनाथ कल्याणशेट्टी यांनी केले.
कल्याणशेट्टी शिक्षण संकुलातील मातोश्री गुरुबसव्वा कल्याणशेट्टी महाविद्यालय, सौ सुरेखा कल्याणशेट्टी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, गिरीजामाता मराठी व सेमी इंग्लिश प्राथमिक विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने स्वामी विवेकानंद तसेच राजमाता जिजाबाई यांची जयंती आणि हुतात्मा दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी प्राचार्य डॉ राजेंद्रसिंह लोखंडे, मुख्याध्यापक मलकप्पा भरमशेट्टी, सुर्यकांत रूगे उपस्थित होते.
पुढे बोलताना ते म्हणाले की, स्वामी विवेकानंदांचे विचार अध्यात्मापुरते मर्यादित नव्हते; ते सामाजिक परिवर्तनाचेही प्रबळ समर्थक होते. युवकांमध्ये त्यांनी आत्मविश्वास, शिस्त आणि राष्ट्रभक्ती प्रफुल्लित केली शिक्षण, सेवा आणि मानवकल्याण हे त्यांच्या कार्याचे सूत्र होते . त्यांच्या विचारामुळेच देशाचा आत्मसन्मान आणि आत्मविश्वास वृद्धिंगत झाला त्यामुळेच त्यांचे विचार आज भारतीय समाज जोपासत आहे.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाबाई यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले, कुमारी अक्षता साठे हिने राजमाता जिजाबाईच्या वेशभूषा मध्ये होय मी जिजाऊ बोलते यावर भाषण केले. यावेळी इ. 9 वी तील अपेक्षा शिंदे, ऐश्वर्या माळी, प्रीती फुलारी, संस्कृती क्षीरसागर, स्नेहा देडे, अक्षता साठे व धानेश्वरी बगले या मुलीनी पोवाडा सादरीकरण केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक मलकप्पा भरमशेट्टी यांनी केले, सूत्रसंचालन कल्पना स्वामी यांनी केले तर आभार सुर्यकांत रूगे यांनी मानले.
चौकटीतील मजकूर
जिजाबाईंचे राष्ट्र निर्माण मध्ये उल्लेखनीय योगदान
छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री जिजाबाईंचे जीवन मातृत्व, त्याग, शौर्य आणि राष्ट्रभक्तीचे प्रतीक होते. राष्ट्रनिर्माण मध्ये त्यांनी उल्लेखनीय योगदान दिले म्हणूनच आजही आदर्श माता म्हणून त्यांचे नाव आदराने घेतले जाते असे गौरवोद्गार कल्याणशेट्टी यांनी काढले.
हुतात्म्यांचे कार्य वंदनीय
भारताच्या स्वातंत्र्य चळवळीसाठी प्राणाची आहुती देणारे मल्लप्पा धनशेट्टी, जगन्नाथ शिंदे, श्रीकिशन सारडा, कुर्बान हुसेन यांचे कार्य वंदनीय असून त्यांचा त्याग समाज विसरणार नाही, असे यावेळी आपल्या भाषणातून कल्याणशेट्टी यांनी सांगितले.
पंचप्पा कल्याणशेट्टी शिक्षण संकुलात स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाबाई यांच्या प्रतिमेस अभिवादन करताना मल्लिनाथ कल्याणशेट्टी व मान्यवर


















