करकंब : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जळोलीचे शिक्षक भौतिक आणि सर्वांगीण विकासासाठी नेहमीच प्रयत्नशील असतात लोकवर्गणीस उदंड प्रतिसाद मिळत असतानाच जळोली शाळेचे आदर्श शिक्षक बाळासाहेब खांडेकर यांच्या प्रयत्नातून अकलूज येथील प्रसिद्ध नेत्ररोग तज्ञ डॉ.राजीव महावीर गांधी यांनी जि.प. प्रा.शाळा जळोलीस भेट देत शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी होणारा प्रयत्न पाहिला.
डोळ्यांसबंधी होणाऱ्या आजाराविषयी माहिती देत डोळ्यांविषयी काळजी कशी घ्यावी याविषयी विद्यार्थ्यांना महत्वपूर्ण मार्गदर्शन केले.विद्यार्थ्यांसाठी मोफत नेत्ररोग शिबिर आयोजित करून डोळ्यांच्या तक्रारीसाठी वैद्यकीय उपचार करणार असल्याचे सांगितले.यावेळी त्यांनी जळोली शाळेला विद्यार्थ्यांसाठी एक संगणक भेट दिला.प्रसिद्ध ह्रदयरोग तज्ञ डॉ.निनाद फडे यांनीही शाळेसाठी एक झेरॉक्स मशीन भेट देत अनमोल योगदान दिले.शाळेच्यावतीने त्यांचे स्वागत करत सत्कार करण्यात आला.
पुढील काळात शाळेची पटसंख्या जास्तीत जास्त वाढली पाहिजे यासाठी प्रयत्न असणार असून पालकांनीही यासाठी सहकार्य करावे असे आवाहन शिक्षकांनी केले.यावेळी मुख्याध्यापक जयवंत कापसे, शिक्षक ज्ञानेश्वर दुधाणे,नागनाथ गायकवाड,सिध्देश्वर लोंढे,कैलास नरसाळे,बाळासाहेब खांडेकर, शिक्षिका देवकी कलढोणे (दुधाणे) यांनी डॉ.गांधी यांचे आभार मानले.यावेळी जळोली शाळा व्यवस्थापन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी कौतुक करत अभिनंदन केले.



















