बार्शी – डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघाच्या बार्शी शाखेची कार्यकारिणी पदग्रहण व आढावा बैठक बार्शी येथे खेळीमेळीच्या व सकारात्मक वातावरणात पार पडली. संघटनेचे सर्वेसर्वा राजा माने यांच्या मार्गदर्शनाखाली तर संघटनेचे ज्येष्ठ मार्गदर्शक सूर्यकांत वायकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीस राष्ट्रीय समन्वयक मुरलीधर चव्हाण, राज्य कार्यकारिणी सदस्य संतोष सूर्यवंशी, राज्य प्रसिद्धीप्रमुख धीरज शेळके, राज्य तांत्रिक सल्लागार नागेश सुतार, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष प्रवीण नागणे, सोलापूर जिल्हाध्यक्ष सचिन कुलकर्णी, जिल्हा सहसचिव किरण माने, जिल्हा संघटक तानाजी जाधव, महिला जिल्हाध्यक्ष नीता देव, महिला जिल्हा उपाध्यक्ष राजश्री गवळी, बार्शी तालुका अध्यक्ष सिद्धार्थ बसवंत यांच्यासह अनेकजण उपस्थित होते.
या बैठकीत बार्शी तालुका अध्यक्ष सिद्धार्थ बसवंत, उपाध्यक्ष अक्षय बारंगुळे, तालुका ग्रामीण अध्यक्ष भैरवनाथ चौधरी, सचिव शंकर लाखे, खजिनदार विश्वास वीर, संपर्कप्रमुख श्रीशैल माळी, तालुका महिला अध्यक्ष प्रतिज्ञा वाळके यांच्यासह अभिजीत शिंदे, परशुराम राऊत, रवींद्र सांगोळे, स्वप्निल पोकळे व किशोर शेटे यांची कार्यकारी सदस्य म्हणून निवड करण्यात आली. सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना मान्यवरांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.
यावेळी सोलापूर जिल्हाध्यक्ष सचिन कुलकर्णी व पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष प्रवीण नागणे यांनी संघटनेच्या ध्येयधोरणांवर प्रकाश टाकत पत्रकारांनी संघटित राहून सामाजिक बांधिलकी जोपासावी, असे आवाहन केले. राज्य तांत्रिक सल्लागार नागेश सुतार यांनी डिजिटल प्लॅटफॉर्मवर काम करताना घ्यावयाची काळजी, येणाऱ्या तांत्रिक अडचणी व त्यावरील उपाययोजना याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. उपस्थित पत्रकारांच्या शंकांचे त्यांनी समाधानकारक निरसन केले.
बैठकीत विविध सामाजिक व संघटनात्मक ठराव मांडून ते सर्वानुमते मंजूर करण्यात आले. यामध्ये दि. ४ फेब्रुवारी रोजी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांच्या वाढदिवसानिमित्त व कर्मवीर मामासाहेब जगदाळे यांच्या जयंतीनिमित्त बार्शी नगरपरिषदेसमोर विद्यार्थ्यांना ५०० लिटर सुगंधी मसाला दूध वाटप करणे, संघटनेचा वर्धापन दिन साजरा करुन त्यावेळी जिल्ह्यातील वेगवेगळ्या सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करण्यात आलेल्या व्यक्ती व संस्थांचा पुरस्कार देऊन गौरव करणे, पत्रकारांच्या पाल्यांना शैक्षणिक साहित्य वाटप व गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करणे, तसेच डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघाचे सर्वेसर्वा राजा माने यांना विधान परिषदेवर आमदार म्हणून संधी मिळावी, यासाठी संघटनेच्या सर्व प्रतिनिधी व पदाधिकाऱ्यांनी पाठपुरावा व मागणी करावी, असा ठराव मंजूर करण्यात आला.
शंकरराव चव्हाण पत्रकार कल्याण समितीचे संचालक, डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष, जेष्ठ संपादक राजा माने यांचे राज्यातील पत्रकारांच्या न्याय व हक्कासाठी गेल्या अनेक वर्षांपासून चालू असलेले अविरत कार्य वाखाणण्याजोगे आहे. संघटनेच्या माध्यमातून व प्रतिबंध प्रतिष्ठानच्या माध्यमातून पत्रकारांच्या कुटुंबीयांसाठी व मुला मुलींच्या शिक्षणासाठी व आरोग्यासाठी लाखो रुपयांची मदत करुन अनेकांना न्याय देण्याचे काम केले आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन राजा माने यांना विधान परिषदेवर आमदार म्हणून घेण्याची जोरदार मागणी होत आहे.
याशिवाय दि. १९ मार्च रोजी संघटनेचा वर्धापनदिन मोठ्या उत्साहात व भव्यदिव्य स्वरुपात साजरा करणे, त्या निमित्ताने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सात व्यक्ती अथवा संस्थांचा पुरस्कार देऊन गौरव करणे, तसेच जून महिन्यात शाळा सुरू झाल्यानंतर पत्रकारांच्या पाल्यांना शालेय साहित्य वाटप करणे व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्याचे ठराव एकमताने संमत करण्यात आले.


















